whatsapp reduces forward message limit to one chat at time to curb fake news during coronavirus rkp | Coronavirus : WhatsAppचा मोठा निर्णय, Message Forwardingवर घातली मर्यादा

Coronavirus : WhatsAppचा मोठा निर्णय, Message Forwardingवर घातली मर्यादा

नवी दिल्ली : सोशल मीडियावर कोरोना व्हायरससंबंधी अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे सोशल मीडियात लोकप्रिय असणाऱ्या व्हॉट्सअ‍ॅपने मोठा निर्णय घेतला आहे. व्हॉट्सअ‍ॅपने मेसेज फॉरवर्डिंगवर मर्यादा घालण्याचा निर्णय घेतला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप युजर्स आता कोणताही मेसेज एकदाच फक्त एका युजरला फॉरवर्ड करु शकणार आहेत. याआधी कोणताही मेसेज एकदाच पाच युजर्सला फॉरवर्ड करण्याची सुविधा देण्यात आली होती. मात्र, हे व्हॉट्सअ‍ॅपचे फीचर अपडेट केल्यानंतर अॅक्टिव्ह होणार आहे. दरम्यान, कोरोना व्हायरसवरून सोशल मीडियावर नेटिझन्सकडून वेगवेगळ्या खोट्या बातम्या शेअर करण्यात येत आहे. त्यामुळे सोशल मीडियातील ट्विटर, गुगल आणि फेसबुक यासारख्या कंपन्यांसमोर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

कोरोनासंबंधी अफवा पसरवण्यात येऊ नये, यासाठी फेसबुकची मालकी असलेल्या व्हॉट्सअ‍ॅप कंपनीने आता मेसेज  फॉरवर्डिंगसाठी मर्यादा घातली आहे. यानुसार, युजर्स कोणताही मेसेज एकदाच फक्त एका व्यक्तीला फॉरवर्ड करु शकतात. याआधी फेसबुकने सुद्धा आपल्या प्लॅटफॉर्मवर खोट्या बातम्यांवर आळा घालण्यासाठी अशप्रकारचा निर्णय घेतला आहे. तर गुगलही खोट्या बातम्यांना फ्लॅग करत आहे. याशिवाय, मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटर सुद्धा खोट्या बातम्यांना रोखण्यासाठी फिल्टर करत आहे. 

दरम्यान, व्हॉट्सअ‍ॅपच्या या निर्णयाचे सोशल मीडियात कौतुक होत आहे. कंपनीचा हा निर्णय स्वागतार्ह आहे. यामुळे निश्चितपणे खोट्या बातम्या किंवा अफवांना आळा बसेल, असे सांगण्यात येत आहे. संपूर्ण जगभरात व्हॉट्सअ‍ॅपचे दोन अब्जहून अधिक अॅक्टिव्ह युजर्स आहेत. तर भारतात ४० कोटीहून अधिक लोक व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतात.

Web Title: whatsapp reduces forward message limit to one chat at time to curb fake news during coronavirus rkp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.