फोल्डेबल आयफोनमध्ये काय काय मिळणार? अॅप्पलनं निश्चित केले फीचर्स, किंमत जाणून थक्क व्हाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 12:51 IST2025-12-16T12:50:28+5:302025-12-16T12:51:48+5:30
आता ताज्या माहितीनुसार, ॲपलने या फोनच्या डिस्प्ले आणि कॅमेऱ्यासह अनेक महत्त्वाचे फीचर्स निश्चित केले आहेत. यामुळे, फोल्डेबल आयफोनमध्ये युजर्सना नेमके काय काय मिळणार? हे आता जवळपास निश्चित झाले आहे.

फोल्डेबल आयफोनमध्ये काय काय मिळणार? अॅप्पलनं निश्चित केले फीचर्स, किंमत जाणून थक्क व्हाल!
अमेरिकन टेक कंपनी ॲपल (Apple) आता फोल्डेबल स्मार्टफोन मार्केटमध्ये पाऊल ठेवण्यास सज्ज झाली आहे. कंपनीचा हा बहुप्रतिक्षित पहिला फोल्डेबल आयफोन (Foldable iPhone) सप्टेंबर, २०२६ मध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी, या फोनसंदर्भात अनेक गोष्टी समोर आल्या होत्या. मात्र आता ताज्या माहितीनुसार, ॲपलने या फोनच्या डिस्प्ले आणि कॅमेऱ्यासह अनेक महत्त्वाचे फीचर्स निश्चित केले आहेत. यामुळे, फोल्डेबल आयफोनमध्ये युजर्सना नेमके काय काय मिळणार? हे आता जवळपास निश्चित झाले आहे.
डिस्प्ले आणि अनलॉक फीचर -
हा फोल्डेबल आयफोन स्लिम रहावा, म्हणून याला फेस आयडी (Face ID) सुविधा नसेल. तसेच, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट रीडरही नसेल. या ऐवजी, फोन अनलॉक करण्यासाठी बाजूच्या बटणावरच फिंगरप्रिंट स्कॅनर दिले जाईल.
डिस्प्लेच्या साइजसंदर्भात बोलायचे झाल्यास, मुख्य डिस्प्ले ७.५८ इंचांचा तर कव्हर डिस्प्ले ५.२५ इंचचा असेल. विशेष म्हणजे, या आयफोनची रुंदी सॅमसंगच्या फोल्डेबल फोनच्या तुलनेत, अधिक असण्याची शक्यता असेल. यामुळे तो अनफोल्ड केल्यावरही हॉरिझॉन्टली अधिक मोठा दिसेल. या फोल्डेबल आयफोनच्या डिस्प्लेवर क्रीज (घडीची खूण) नसेल, यामुळे स्क्रीन फोल्ड झाल्याचे कळणार नाही.
कॅमेरा सेटअप
महत्वाचे म्हणजे, या फोनचे कॅमेरा फीचर्स देखील निश्चित झाले आहेत. फोल्डेबल आयफोन अंडर-डिस्प्ले सेल्फी कॅमेऱ्यासह (Under-Display Selfie Camera) लॉन्च होईल, यात २४MP चा सेन्सर असण्याची शक्यता आहे. तसेच, मागच्या बाजूसाठी ४८MP सेन्सर असलेला ड्युअल कॅमेरा सेटअप (Dual Camera Setup) दिला जाईल.
किंमत जाणून थक्क व्हाल -
ॲपल या आयफोनमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. यामुळ या फोनची किंमतही फार अधिक असणार आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, या फोल्डेबल आयफोनची सुरुवातीची किंमत सुमारे ₹२.१५ लाख असू शकते. मात्र एवढी किंमत असूनही, हा फोन ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर आर्षित करेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.