लॅपटॉप चार्जर केबलवरचा 'तो' काळा गोळा कशासाठी असतो? अनेकांनी पाहिला असेल पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 15:35 IST2025-11-10T15:34:23+5:302025-11-10T15:35:13+5:30
Tech knowledge: चार्जर केबलवरील फेराइट बीड (काळा गोळा) नेमके काय काम करतो? EMI नॉईज शोषून तो तुमच्या डिव्हाइसला हँग होण्यापासून कसा वाचवतो? तांत्रिक फायदे जाणून घ्या.

लॅपटॉप चार्जर केबलवरचा 'तो' काळा गोळा कशासाठी असतो? अनेकांनी पाहिला असेल पण...
तुम्ही कधी तुमच्या लॅपटॉप किंवा जुन्या स्मार्टफोनच्या चार्जर केबलकडे लक्ष दिले आहे का? केबलच्या पिनच्या टोकाशी एक छोटा, काळा, दंडगोलाकार जाडसर भाग असतो. बहुतेक लोक याकडे दुर्लक्ष करतात, पण हा छोटासा भाग तुमच्या महागड्या डिव्हाइसच्या सुरक्षिततेसाठी खूप महत्त्वाचा असतो.
या भागाला 'फेराइट बीड' किंवा 'फेराइट चोक' म्हणतात. जेव्हा चार्जर केबलमधून करंट वाहत असतो, तेव्हा तो उच्च-वारंवारतेच्या लहरी किंवा इलेक्ट्रॉनिक नॉईज निर्माण करतो. हा नॉईज किंवा 'इलेक्ट्रिकल गोंगाट' तुमच्या फोन किंवा लॅपटॉपला मिळालेल्या सिग्नलमध्ये अडथळा निर्माण करू शकतो किंवा डिव्हाइसमधील सर्किट खराब करू शकतो.
फेराइट बीडचे कार्य:
नॉईज फिल्टरिंग : हे फेराइट बीड्स एका फिल्टरप्रमाणे काम करतात. ते हे धोकादायक हाय-फ्रिक्वेन्सी सिग्नल शोषून घेतात किंवा निष्क्रिय करतात. नॉईज थांबवल्यामुळे, तुमच्या डिव्हाइसला मिळणारा डेटा किंवा चार्जिंग करंट स्थिर आणि शुद्ध राहतो. या नॉईजमुळे डिव्हाइस हँग होणे, सिग्नल तुटणे किंवा चार्जिंग थांबणे अशा समस्या येतात. फेराइट बीड या सर्व समस्यांपासून संरक्षण करते.
आजकाल फेराइट बीड का दिसत नाही?
जर तुमच्या नवीन फोन किंवा लॅपटॉपच्या चार्जर केबलवर हे फेराइट बीड दिसत नसेल, तर काळजी करण्याची गरज नाही. याचा अर्थ असा आहे की तुमची केबल आणि चार्जर अधिक अॅडव्हान्स तंत्रज्ञानाने बनलेले आहेत. आधुनिक चार्जर आणि केबल कनेक्टर्समध्येच आता 'नॉईज फिल्टरिंग'साठीचे इंटर्नल सर्किट किंवा तंत्रज्ञान समाविष्ट केलेले असते. त्यामुळे बाहेरील या काळ्या बीडची गरज कमी झाली आहे. तरीही, मायक्रोवेव्ह किंवा गीझरसारख्या मोठ्या उपकरणांच्या केबल्सवर हे फेराइट बीड्स अजूनही पाहायला मिळतात.