Truecaller चा खेळ संपणार? TRAI च्या एका निर्णयामुळे २५ कोटी भारतीयांच्या फोनमधून 'हे' ॲप गायब होण्याची शक्यता!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 12:51 IST2025-12-27T12:50:02+5:302025-12-27T12:51:01+5:30
Truecaller vs CNAP India : भारतात TRAI ची CNAP सिस्टिम लागू झाल्यामुळे Truecaller च्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. आता सिम कार्डच्या KYC नुसार कॉलरचे नाव दिसणार.

Truecaller चा खेळ संपणार? TRAI च्या एका निर्णयामुळे २५ कोटी भारतीयांच्या फोनमधून 'हे' ॲप गायब होण्याची शक्यता!
गेल्या दशकापासून अनोळखी कॉल्स आणि स्पॅम कॉल्स ओळखण्यासाठी भारतीयांचे आवडते साधन असलेले 'ट्रूकॉलर' सध्या मोठ्या संकटात सापडले आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने आणलेल्या नवीन CNAP या प्रणालीमुळे ट्रूकॉलरच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
भारतात लवकरच CNAP प्रणाली पूर्णपणे लागू केली जाणार आहे. या सिस्टिमचे वैशिष्ट्य म्हणजे, जेव्हा तुम्हाला फोन येईल, तेव्हा कॉलरचे नाव तुमच्या मोबाईल स्क्रीनवर आपोआप दिसेल. यासाठी तुम्हाला ट्रूकॉलरसारख्या कोणत्याही थर्ड-पार्टी ॲपची गरज भासणार नाही. हे नाव संबंधित व्यक्तीच्या सिम कार्डच्या 'KYC' कागदपत्रांवर आधारित असेल, ज्यामुळे ते ट्रूकॉलरपेक्षा अधिक अचूक आणि विश्वासार्ह मानले जात आहे.
CNAP ही सुविधा थेट एअरटेल, जिओ आणि व्हीआय यांसारख्या टेलिकॉम कंपन्यांच्या नेटवर्कवरून दिली जाईल. ट्रूकॉलर वापरण्यासाठी युझर्सना त्यांच्या कॉन्टॅक्ट लिस्टचा ॲक्सेस द्यावा लागतो. CNAP मध्ये अशा कोणत्याही ॲक्सेसची किंवा डेटा शेअरिंगची गरज नसल्याने युझर्सचा कल या सरकारी सुविधेकडे वाढू शकतो. भारतात ट्रूकॉलरचे २५ कोटींहून अधिक युझर्स आहेत. मात्र, जिओ आणि एअरटेलने ही सेवा पूर्णपणे कार्यान्वित केल्यास मोठ्या प्रमाणात युझर्स ट्रूकॉलर अनइन्स्टॉल करण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
ट्रूकॉलरचा पुढचा रस्ता काय?
बाजारातील तज्ज्ञांच्या मते, केवळ 'नाव दाखवणे' या सुविधेवर विसंबून राहिल्यास ट्रूकॉलरचा प्रवास भारतात थांबू शकतो. कंपनीला आता एआय आधारित फ्रॉड डिटेक्शन आणि बिझनेस कम्युनिकेशन टूल्सवर लक्ष केंद्रित करावे लागेल. अन्यथा, एकेकाळी स्मार्टफोनमधील गरजेचे असलेले हे ॲप इतिहासात जमा होऊ शकते. परंतू, ट्रूकॉलर हे ज्या व्यक्तीच्या नावावर कार्ड आहे त्याचा नाही तर ते कार्ड जो व्यक्ती वापरत आहे त्याचे नाव दाखविते. यामुळे लोक याचा वापर सुरुच ठेवण्याची दाट शक्यता आहे.