लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 11:37 IST2025-10-29T11:36:16+5:302025-10-29T11:37:01+5:30
TRAI CNAP Service, Caller Name Display: बनावट कॉल आणि फसवणुकीला लगाम लागणार; KYC मध्ये नोंदवलेले नाव स्क्रीनवर दिसेल, सेवा 'डिफॉल्ट' स्वरूपात सक्रिय राहणार

लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार
नवी दिल्ली: मोबाईल वापरकर्त्यांना अनोळखी क्रमांकावरून येणाऱ्या कॉलमुळे होणाऱ्या फसवणुकीपासून वाचवण्यासाठी दूरसंचार नियामक मंडळ TRAI (ट्राय) आणि दूरसंचार विभाग DoT यांनी मोठा निर्णय घेतला आहे. लवकरच 'कॉलर नेम डिस्प्ले' (Calling Name Presentation - CNAP) ही नवी सुविधा सुरू केली जाणार आहे. यामुळे कॉल करणाऱ्या व्यक्तीचे नाव आता थेट तुमच्या मोबाईल स्क्रीनवर दिसणार आहे.
या नवीन व्यवस्थेमुळे, कॉल करणाऱ्या व्यक्तीने आपल्या मोबाईल नंबरसाठी KYC मध्ये जे नाव नोंदवले आहे, तेच नाव स्क्रीनवर दिसेल. यामुळे थर्ड-पार्टी ॲप्सची गरज भासणार नाही आणि बनावट कॉल तसेच फसवणूक करणाऱ्यांना लगाम घालणे शक्य होईल.
सेवा डिफॉल्ट स्वरूपात
सुरुवातीला CNAP सेवा ग्राहकांच्या विनंतीनुसार सक्रिय करण्याची चर्चा होती. मात्र, DoT च्या सूचनेनुसार आणि ट्रायच्या मान्यतेनंतर, ही सुविधा आता डिफॉल्ट स्वरूपात सर्व मोबाईल वापरकर्त्यांसाठी सक्रिय केली जाईल. वापरकर्त्यांना ही सेवा नको असल्यास, ते विनंती करून ती डिअॅक्टीव्हेट करू शकतात.
फक्त यांचे नाव दिसणार नाही...
ज्या ग्राहकांनी CLIR (Calling Line Identification Restriction) सुविधा घेतली आहे, त्यांचे नाव स्क्रीनवर दिसणार नाही. गुप्तचर संस्था, व्हीआयपी आणि विशिष्ट निवडक लोकांना ही सूट दिली जाईल. CLIR साठी अर्ज करणाऱ्यांची संपूर्ण तपासणी केली जाईल. गेल्या वर्षी मुंबई आणि हरियाणा सर्कलमध्ये या सेवेचे यशस्वी ट्रायल घेण्यात आले होते.
खासगी अॅपची काय समस्या...
अनेकदा ट्रू कॉलरसारख्या अॅपवर नाव वेगळेच येते आणि बोलणारा व्यक्ती दुसराच असतो. अनेकदा हे लोक कंपन्या किंवा फसवणूक करणारे असतात. त्यामुळे हा नंबर कोणाचा आहे, आपल्या गरजेचा आहे का हे समजत नाही. यामुळे अशा स्पॅम कॉलची कटकट कामाच्या वेळी, गाडीवर असताना मागे लागते. या त्रासापासून मुक्तता होणार नसली तरी त्या नंबरच्या खऱ्या मालकाचे नाव आल्याने युजरना तो कॉल उचलायचा की नाही हे ठरविणे सोपे जाणार आहे.