१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 20:48 IST2025-08-04T20:46:56+5:302025-08-04T20:48:43+5:30
सॅमसंगच्या मोबाईलांनी भरलेला ट्रक चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे.

१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
मोबाईल चोरी झाल्याच्या घटना तुम्ही अनेक पाहिल्या असतील. पण, मोबाईल घेऊन जाणारा आख्खा ट्रक चोरीला गेल्याचे तुम्ही पाहिले आहे का? ही घटना लंडनमधील आहे. सॅमसंगच्या नवीन फोल्ड स्मार्टफोनने भरलेला एक ट्रक चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. लंडनच्या हीथ्रो विमानतळाजवळ सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला एक ट्रक गायब झाला, यामध्ये सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप ७ आणि गॅलेक्सी झेड फोल्ड ७ आणि इतर स्मार्टफोनचे सुमारे १२ हजार युनिट होते.
सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला एक ट्रक विमानतळावरून गोदामात जात असताना ही चोरी झाली. या ट्रकमध्ये गॅलेक्सी झेड फोल्ड ७ चे ५,००० युनिट्स, गॅलेक्सी झेड फ्लिप ७ चे ५,००० युनिट्स आणि गॅलेक्सी वॉच ८ चे ५,००० युनिट्स होते.
यासोबतच ट्रकमध्ये सॅमसंगच्या गॅलेक्सी S25 सिरीज आणि सॅमसंग गॅलेक्सी A 16 स्मार्टफोनचाही समावेश होता. या फिल्मी स्टाईल चोरीमध्ये ९१ कोटी रुपयांचे सॅमसंग डिव्हाइस चोरीला गेल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे.
या आधीही अशा घटना घडल्या
अशी घटना पहिलीच घडलेली नाही. २०२० च्या सुरुवातीला भारतात सॅमसंग गॅलेक्सी स्मार्टफोनचे सुटे भाग चोरीला गेले होते. त्यानंतर नोएडा येथील एका कारखान्यातून सुमारे ३.३० लाख डॉलर्स किमतीचे सुटे भाग चोरीला गेले होते. या प्रकरणात नोएडा पोलिसांनी सहा जणांना अटक केली होती. सॅमसंगचे सुटे भाग चोरणाऱ्यांमध्ये तीन ट्रक चालकांचाही समावेश होता.
२०२३ मध्ये अमेरिकेतील अॅपल स्टोअरमधून फिल्मी स्टाईल चोरी झाली होती. चोरांनी अॅपल स्टोअरमध्ये एक बोगदा खोदला होता. यामध्ये चोरांनी ४३६ आयफोन चोरले, यांची किंमत सुमारे ४ कोटी रुपये होती. चोरांनी जवळच्या कॉफी शॉपच्या बाथरूममधून अॅपल स्टोअरमध्ये एक बोगदा बनवला होता.