मोबाईल कंपन्यांच्या दरात येणार पारदर्शकता
By शेखर पाटील | Updated: June 5, 2018 13:00 IST2018-06-05T13:00:00+5:302018-06-05T13:00:00+5:30
मोबाईल कंपन्यांच्या दरात पारदर्शकता येण्यासह सर्व कंपन्यांचे प्लॅन एकाच ठिकाणी पाहता यावे यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधीकरण म्हणजेच ट्रायने पुढाकार घेतला आहे.

मोबाईल कंपन्यांच्या दरात येणार पारदर्शकता
ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी विविध कंपन्या नवनवीन प्लॅन सादर करत असतात. प्रत्येक कंपनी आठवड्यातून एखादा तरी नवीन प्लॅन सादर करते. यात काही प्लॅन हे फक्त कॉलींगसाठी, काही फक्त डाटासाठी तर काही काँबो या प्रकारातील असतात. यातच एखादा प्लॅन हा विशिष्ट टेलकॉम सर्कलसाठीच सुरू करण्यात आलेला असतो. तसेच सर्वात महत्वाची बाब म्हणजे काही प्लॅनमध्ये कंपनीच्या छुप्या अटी-शर्तीदेखील असतात. यामुळे ग्राहकांचा नेहमीच गोंधळ उडत असतो. नेमकी हीच समस्या लक्षात घेऊन यात पारदर्शकता आणण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधीकरण अर्थात ट्रायने पुढाकार घेतला आहे.
खरं तर ट्रायने अलीकडेच विविध प्लॅन्समध्ये तुलना करणारे टुल सादर केले आहे. मात्र याच्या सोबतीला देशातील २२ टेलीकॉम सर्कलमधील सर्व कंपन्यांचे सर्व प्लॅन हे एकाच ठिकाणी पहायला मिळणार आहेत. यामुळे अर्थातच पारदर्शकता जोपासली जाणार आहे. याच्या सोबतीला ग्राहकांना सर्व प्लॅन्स एकाच ठिकाणी पाहता येतील. साधारणपणे या वर्षाच्या अखेरपर्यंत या प्रकल्पाला पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती ट्रायतर्फे देण्यात आली आहे. यासाठी स्वतंत्र संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात येणार आहे.