चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 15:56 IST2025-08-17T15:40:09+5:302025-08-17T15:56:09+5:30

WhatsApp Screen Mirroring Fraud : आजकाल ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण खूप वाढले आहे आणि त्यातीलच एक नवीन धोका म्हणजे व्हॉट्सॲप स्क्रीन मिररिंग स्कॅम.

Thieves find new way to empty bank accounts; What is 'WhatsApp Screen Mirroring Fraud'? | चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?

चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?

आजकाल प्रत्येकजण ऑनलाईन पेमेंट वापरत आहे. दरम्यान, ऑनलाईन स्कॅम आणि घोटाळे देखील वाढले आहेत. आता वनकार्ड कंपनीने आपल्या ग्राहकांना व्हॉट्सॲप स्क्रीन मिररिंग फसवणुकीबद्दल (WhatsApp Screen Mirroring Fraud) नुकतीच एक महत्त्वाची सूचना दिली आहे. या फसवणुकीमुळे ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसू शकतो, त्यामुळे प्रत्येकाने याबाबत सावध राहणे गरजेचे आहे.

व्हॉट्सॲप स्क्रीन मिररिंग स्कॅम काय आहे?
आजकाल ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण खूप वाढले आहे आणि त्यातीलच एक नवीन धोका म्हणजे व्हॉट्सॲप स्क्रीन मिररिंग स्कॅम. या फसवणुकीत, सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करून त्यांना स्क्रीन शेअरिंग सुरू करायला लावतात आणि नंतर त्यांची खाजगी माहिती जसे की ओटीपी, बँक डिटेल्स, पासवर्ड आणि मेसेजेस चोरतात. यामुळे पीडित व्यक्तीला आर्थिक नुकसान होते.

हा घोटाळा नेमका कसा चालतो?
फसवणूक करणारा व्यक्ती स्वतःला बँक किंवा कोणत्याही आर्थिक संस्थेचा कर्मचारी असल्याचे भासवतो. तुमच्या खात्यात काहीतरी अडचण असल्याचा बहाणा करून तो तुम्हाला कॉल करतो. हा व्यक्ती तुम्हाला व्हॉट्सॲपवर व्हिडीओ कॉल करायला सांगतो आणि स्क्रीन शेअरिंग सुरू करण्यास सांगतो. एकदा तुम्ही स्क्रीन शेअरिंग सुरू केल्यावर, तो तुमच्या फोनच्या स्क्रीनवर काय सुरू आहे हे रिअल-टाइममध्ये पाहू शकतो.

तुम्ही तुमच्या मोबाइलमध्ये तुमच्या बँकिंग ॲप्स, युपीआय किंवा इतर ॲप्स वापरताना पासवर्ड किंवा ओटीपी टाकता, तेव्हा हॅकर्स ते लगेच पाहतात आणि त्यांचा वापर तुमच्या खात्यातून पैसे काढण्यासाठी किंवा इतर अनधिकृत व्यवहारांसाठी करतात. काही वेळा, गुन्हेगार तुमच्या मोबाइलमध्ये कीबोर्ड लॉगर नावाचे सॉफ्टवेअर इंस्टॉल करतात. यामुळे, तुम्ही कोणताही शब्द टाइप केल्यास, पासवर्ड किंवा ओटीपी टाकल्यास ते थेट हॅकर्सकडे पोहोचतात.

चोरी केलेल्या माहितीचा वापर
तुमच्याकडून मिळालेल्या माहितीचा वापर करून सायबर गुन्हेगार अनेक प्रकारची फसवणूक करतात. यामध्ये तुमच्या बँक खात्यातून अनधिकृत व्यवहार करणे, सोशल मीडिया आणि युपीआय खात्यांमध्ये प्रवेश मिळवणे, आणि तुमच्या ओळखपत्राचा गैरवापर करणे यांचा समावेश आहे.

कशी कराल सुरक्षा?
अनेक मोठ्या बँकिंग ॲप्समध्ये स्क्रीन कॅप्चर ब्लॉक, सुरक्षित सेशन्स आणि टाइमआउट्स सारखी सुरक्षा वैशिष्ट्ये असतात. मात्र, जर तुम्ही अनोळखी व्यक्तीला स्क्रीन शेअर करण्याची परवानगी दिली, तर काही ॲप्सची सुरक्षा सहजपणे बायपास होऊ शकते. म्हणूनच काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. 

> कॉल करणाऱ्या व्यक्तीची ओळख त्यांच्या अधिकृत नंबरवरून नेहमी तपासणी करा.

> केवळ विश्वासार्ह व्यक्तींसोबतच स्क्रीन शेअर करा.

> मोबाइलमध्ये 'unknown sources'मधून ॲप्स इंस्टॉल करण्याचा पर्याय बंद ठेवा.

> संशयास्पद नंबर ताबडतोब ब्लॉक करा आणि cybercrime.gov.in किंवा १९३० या नंबरवर तक्रार करा.

> तुमच्या सर्व आर्थिक आणि मेसेजिंग ॲप्समध्ये टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन चालू ठेवा.

> अनोळखी किंवा संशयास्पद नंबरवरून आलेल्या कॉलला उत्तर देऊ नका.

> स्क्रीन शेअरिंग सुरू असताना कधीही युपीआय, बँकिंग किंवा वॉलेट ॲप्सचा वापर करू नका.

> दबाव आणणाऱ्या किंवा घाबरवणाऱ्या कॉलरच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका.

Web Title: Thieves find new way to empty bank accounts; What is 'WhatsApp Screen Mirroring Fraud'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.