...अन्यथा मोठा सायबर हल्ला होणार; कोट्यवधी अँड्रॉईड युजर्सना CERT-In चा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 15:29 IST2025-11-07T15:29:17+5:302025-11-07T15:29:31+5:30
Android 13, 14, 15 आणि 16 व्हर्जनसाठी मोठा धोका.

...अन्यथा मोठा सायबर हल्ला होणार; कोट्यवधी अँड्रॉईड युजर्सना CERT-In चा इशारा
भारत सरकारच्या कंप्यूटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ने देशातील कोट्यवधी अँड्रॉईड युजर्ससाठी इमरजन्सी इशारा जारी केला आहे. या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्यास युजर्सना मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते.
Android 13, 14, 15 आणि 16 व्हर्जनवर धोका
CERT-In ने दिलेल्या माहितीनुसार, Android ऑपरेटिंग सिस्टीममध्ये अनेक गंभीर त्रुटी आढळल्या आहेत. या बगचा फायदा घेऊन सायबर गुन्हेगार डिव्हाइसवर “arbitrary code” चालवू शकतात, म्हणजेच फोनवर पूर्ण नियंत्रण मिळवू शकतात.
या बगचा परिणाम Android 13, 14, 15 आणि अगदी नवीन 16 व्हर्जनपर्यंत होतो आहे. त्यामुळे Pixel, Vivo, Oppo, Xiaomi, Realme, Motorola, OnePlus आणि Samsung सारख्या ब्रँड्सचे वापरकर्ते सर्वाधिक धोक्यात आहेत.
हार्डवेअर कंपन्यांमधील त्रुटी
CERT-In च्या अहवालानुसार, या त्रुटी केवळ सॉफ्टवेअरमध्ये नाहीत, तर हार्डवेअर स्तरावरही आहेत. यात Qualcomm, NVIDIA, Broadcom आणि Unisoc सारख्या कंपन्यांचे कॉम्पोनेंट्स सहभागी आहेत आणि हेच चिपसेट जवळजवळ सर्व अँड्रॉईड फोन्समध्ये वापरले जातात.
सरकारी एजन्सीने या समस्येला “High Risk” श्रेणीत ठेवले आहे. म्हणजेच हॅकर्स युजर्सची वैयक्तिक आणि आर्थिक माहिती चोरू शकतात, अगदी बँक खात्यातून पैसे उडवण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.
अपडेट करणे अत्यावश्यक
चांगली बाब म्हणजे, Google ला या बगची माहिती मिळाली आहे आणि नोव्हेंबर सिक्युरिटी पॅचमध्ये ती दुरुस्त केली गेली आहे. मात्र, जोपर्यंत युजर्स आपल्या फोनवर हा पॅच इंस्टॉल करत नाहीत, तोपर्यंत फोन सायबर हल्ल्याच्या धोक्यातच राहील.
फोन सुरक्षित ठेवण्यासाटी काय करावे?
फोनचा सॉफ्टवेअर तात्काळ अपडेट करा.
सेटिंग्समध्ये “Auto Update” ऑन ठेवा, म्हणजे अपडेट येताच फोन आपोआप अपडेट होईल.
Google Play Protect नेहमी सक्रिय ठेवा.
कोणतेही संशयास्पद लिंक, ईमेल किंवा अटॅचमेंट उघडू नका.
थर्ड पार्टी अॅप्स डाउनलोड करण्याचे टाळा.