डिजिटल जाळ्यात अडकतेय किशोरवयीन पिढी; लाइक्स, कमेंट्सच्या भुकेने वाढतोय ‘त्रास’
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 13:03 IST2026-04-08T13:03:26+5:302026-04-08T13:03:41+5:30
भावनांचा 'एक्सिलरेटर' फुल, पण आवर घालणाऱ्या ‘समजूतदारपणाच्या ब्रेक’चा अभाव

डिजिटल जाळ्यात अडकतेय किशोरवयीन पिढी; लाइक्स, कमेंट्सच्या भुकेने वाढतोय ‘त्रास’
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: सोशल मीडियावरील एक ‘लाईक’ किंवा ‘इमोजी’ किशोरवयीन मुलांसाठी अमली पदार्थांसारखी ठरत आहे. ज्या वयात बुद्धीवर नियंत्रण मिळवणारा मेंदूचा भाग पूर्ण विकसितही झाला नसतो, त्याच वयात मुले ‘डिजिटल हल्ल्यांच्या’ कचाट्यात सापडत आहेत.
कौतुकाच्या एका कमेंटसाठी आसुसलेली ही पिढी प्रत्यक्षात ‘डोपामाइन’च्या छुप्या व्यसनाची शिकार होत असून, दुर्लक्ष केले गेल्यास होणारी घुसमट त्यांना नैराश्याच्या गर्तेत ढकलत असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे.
भावना वेगवान
या वयात मुलांच्या मेंदूतील भावना हाताळणारा भाग (लिम्बिक सिस्टीम) पूर्ण सक्रिय असतो, पण शांतपणे विचार करणारा भाग (प्री-फ्रंटल कॉर्टेक्स) २५ वर्षांपर्यंत पूर्ण विकसित झालेला नसतो म्हणूनच मुलांत भावनांचा वेग एक्सिलरेटर फुल असतो, पण आवर घालणारा ‘समजूतदारपणाचा ब्रेक’ मात्र नसतो.
नेमकं काय घडतंय मुलांच्या मेंदूत?
संशोधनानुसार, किशोरवयीन मुलांचा मेंदू कौतुक किंवा बक्षीस मिळवण्यासाठी खूप जास्त उत्सुक असतो पण त्याचवेळी स्वतःच्या भावनांवर नियंत्रण मिळवण्याच्या बाबतीत तो कमकुवत असतो.
सोशल मीडियावर जेव्हा कोणी ‘लाईक’ करते, तेव्हा त्यांच्या मेंदूत ‘डोपामाइन’ नावाच्या आनंदी रसायनाचा स्फोट होतो व त्यांना क्षणिक सुख मिळते.
प्रतिसाद न मिळाल्यास ‘त्रास’
जर एखाद्या पोस्टला अपेक्षित लाईक्स किंवा कमेंट्स मिळाल्या नाहीत, तर मुलांना होणारी मानसिक वेदना ही एखाद्या शारीरिक जखमेसारखीच असते. त्यामुळे त्यांची चिडचिड वाढते, मुलांना न्यूनगंड येतो.