कंपनीच्या CEO ला आला हृदयविकाराचा झटका; स्मार्ट वॉचने वाचवला जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 15:48 IST2023-11-09T15:46:51+5:302023-11-09T15:48:09+5:30
या प्रकरणाची सध्या सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे.

कंपनीच्या CEO ला आला हृदयविकाराचा झटका; स्मार्ट वॉचने वाचवला जीव
Technology News: तंत्रज्ञानाने आपले आयुष्य खूप सोपे बनवले आहे. अनेकदा या तंत्रज्ञानाने माणसाचा जीवही वाचवला आहे. अशी अनेक प्रकरणे आहेत, ज्यात तंत्रज्ञानाने चमत्कार घडवला आहे. असाच एक प्रकार ब्रिटनमधून समोर आला आहे. स्मार्टवॉचने एका व्यक्तीचा जीव त्याच्या वाचवला आहे.
खासगी कंपनी हॉकी वेल्सचे सीईओ पॉल वॅपफॅम यूकेच्या स्वानसी येथील मॉरिस्टन परिसरात नेहमीप्रमाणे सकाळी फिरायला गेले होते. अचानक त्यांच्या छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. पॉलने लगेचच त्यांच्या स्मार्टवॉचद्वारे पत्नीशी संपर्क साधला. त्यांची पत्नी घटनास्थळी पोहोचली आणि त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, तिथे तातडीने उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले.
पॉलने सांगितले की, ते घरापासून पाच मिनिटांच्या अंतरावर होते, तेव्हा त्यांना अचानक छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. वेदना इतकी तीव्र होती की, पॉल रस्त्यावर गुडघे टेकून बसले. पॉलने ताबडतोब त्यांच्या स्मार्टवॉचद्वारे पत्नी लॉराशी संपर्क साधला. पत्नीने त्यांना तातडीने रुग्णालयात नेले आणि डॉक्टरांनी त्यांचे प्राण वाचवले.
स्मार्टवॉच जीव कसा वाचवते?
स्मार्टवॉचमुळे जीव वाचल्याची प्रकरणे यापूर्वीही समोर आली आहेत. स्मार्टवॉचमध्ये एक सेन्सर बसवण्यात आला आहे, जो तुमच्या मनगटातील नसातून तुमच्या हृदयाचे ठोके ओळखतो. प्रत्येक व्यक्तीच्या हृदयाच्या ठोक्याचा वेग मर्यादित असतो, हा वेग कमी-जास्त असल्यास स्मार्टवॉचचा सेन्सर तुम्हाला माहिती देतो, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो.