WhatsApp वर सर्वात मोठा हल्ला! 50 कोटी युजर्सचा डेटा लीक; भारतासह 84 देश फ्रॉडच्या छायेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2022 22:35 IST2022-11-26T22:35:39+5:302022-11-26T22:35:58+5:30
WhatsApp हे युजर्सच्या सुरक्षेसाठी धोकादायक बनले आहे. युजर्सचे फोटो, खासगी माहिती आदी नेहमी लीक होत असते.

WhatsApp वर सर्वात मोठा हल्ला! 50 कोटी युजर्सचा डेटा लीक; भारतासह 84 देश फ्रॉडच्या छायेत
जगातील सर्वाधिक वापरला जाणारा मेसेंजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅपवर मोठा सायबर हल्ला झाला आहे. जवळपास ८४ देशांतील ग्राहकांचा डेटा लीक झाला असून यामुळे बँकिंग फ्रॉडचा धोका वाढला आहे. हे मोबाईल नंबर विक्रीसाठी उपलब्ध झाल्याने खळबळ उडाली आहे.
WhatsApp हे युजर्सच्या सुरक्षेसाठी धोकादायक बनले आहे. युजर्सचे फोटो, खासगी माहिती आदी नेहमी लीक होत असते. परंतू, आता एवढ्या मोठ्या प्रमाणावर माहिती लीक झाल्याचे वृत्त आहे. या वृत्तानुसार या युजर्सना बँकेशी संबंधीत फसवणुकीला सामोरे जावे लागू शकते. आज अनेक बँका वॉट्सअॅपवरून बँकिंग सेवा पुरवत आहेत. व्हॉट्सअॅपनेदेखील पैशांची देवान घेवाण सुरु केली आहे. यामुळे युपीआय नंबर, अकाऊंट नंबर आदी या हॅकरच्या हाती लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ज्या देशांच्या युजर्सचा डेटा लीक झालाय त्यात अमेरिका, ब्रिटन, इजिप्त, सौदी अरेबियासह भारताचाही समावेश आहे. Cybernews ने दिलेल्या वृत्तानुसार हॅकिंग कम्यूनिटी फोरमवर पोस्ट करण्यात आली आहे. यामध्ये व्हॉट्सअॅप डेटाच्या विक्रीचा दावा करण्यात आला आहे. ते 487 दशलक्ष व्हाट्सएप मोबाईल युजरचा 2022 डेटाबेस विकत आहेत.
या डेटाबेसद्वारे फिशिंग हल्ले केले जाऊ शकतात. येत्या काही दिवसांत व्हॉट्सअॅप यूजर्सना अनोळखी नंबरवरून कॉल आणि मेसेज येऊ शकतात, अशी शक्यताही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
डेटा बेसमध्ये सुमारे 3.2 कोटी अमेरिकन युजर्सचा डेटा आहे. इटलीच्या 3.5 कोटी, इजिप्तच्या 4.5 कोटी, सौदी अरेबियाच्या 2.9 कोटी, फ्रान्स 2 कोटी असे युजर्सचा डेटा आहे. यासाठी लाखोंची बोली लावली जात आहे.