भारताच्या हाती लागली जगातील सर्वात शक्तिशाली चिप! २ नॅनोमीटर, क्वालकॉमने बनविली; अश्विनी वैष्णव यांनी केली घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 15:33 IST2026-02-08T15:32:58+5:302026-02-08T15:33:41+5:30
Qualcomm 2nm chip designed in India: भारताच्या सेमीकंडक्टर क्षेत्रात क्रांती! क्वालकॉमने भारतात विकसित केली प्रगत २ नॅनोमीटर चिप. सविस्तर माहिती वाचा.

भारताच्या हाती लागली जगातील सर्वात शक्तिशाली चिप! २ नॅनोमीटर, क्वालकॉमने बनविली; अश्विनी वैष्णव यांनी केली घोषणा
बेंगळुरू: भारताच्या सेमीकंडक्टर मोहिमेला आज एक मोठे यश मिळाले आहे. अमेरिकन चिप निर्माता कंपनी क्वालकॉमने भारतात विकसित केलेल्या आपल्या पहिल्या २ नॅनोमीटर सेमीकंडक्टर चिपचे 'टेप-आउट' यशस्वीपणे पूर्ण केले आहे. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बेंगळुरू येथील क्वालकॉमच्या केंद्राला भेट दिली आणि भारताच्या या तांत्रिक प्रगतीचे कौतुक केले.
काय आहे 'टेप-आउट' आणि २ नॅनोमीटर चिप?
'टेप-आउट' हा चिप डिझाइनिंग प्रक्रियेतील अंतिम टप्पा असतो, ज्यानंतर ती प्रत्यक्ष उत्पादनासाठी पाठवली जाते. ही २ नॅनोमीटर चिप जगातील सर्वात प्रगत तंत्रज्ञानापैकी एक आहे. या छोट्याशा चिपमध्ये सुमारे २० ते ३० अब्ज ट्रान्झिस्टर्स बसवण्यात आले आहेत.
भारतासाठी हे महत्त्वाचे का?
स्वदेशी डिझाइन: ही चिप पूर्णपणे क्वालकॉमच्या बेंगळुरू, चेन्नई आणि हैदराबाद येथील भारतीय अभियंत्यांनी डिझाइन केली आहे. या चिपचा वापर एआय कॉम्प्युटर्स, स्मार्टफोन, ऑटोमोबाईल, रेल्वे, विमाने आणि अगदी अंतराळातील उपग्रहांमध्ये केला जाईल.
बॅक-ऑफिस ते डिझाइन हब
मंत्री वैष्णव म्हणाले की, "भारत आता केवळ असेंबली हब राहिला नसून, कोअर इंटलेक्चुअल प्रॉपर्टी निर्मितीमध्ये जागतिक नेता बनत आहे." याच कार्यक्रमात अश्विनी वैष्णव यांनी 'सेमिकॉन २.०' चा रोडमॅप देखील मांडला. भारताने गेल्या चार वर्षांत ६७,००० सेमीकंडक्टर इंजिनिअर्सना प्रशिक्षित केले आहे, जे जगातील १ दशलक्ष टॅलेंटची कमतरता भरून काढण्यासाठी सज्ज आहेत.