तुम्हीही फोन १००% चार्ज करताय? आताच थांबा; बॅटरी लाईफ वाढवण्याचं 'हे' आहे सीक्रेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 18:40 IST2026-01-26T18:38:06+5:302026-01-26T18:40:09+5:30
फोन चार्जिंगवरून कधी काढावा आणि किती टक्क्यांपर्यंत चार्ज करणे योग्य आहे, हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे.

तुम्हीही फोन १००% चार्ज करताय? आताच थांबा; बॅटरी लाईफ वाढवण्याचं 'हे' आहे सीक्रेट
आजच्या काळात फोन केवळ एक गॅझेट राहिलेला नसून ती आपल्या दैनंदिन जीवनातील एक मूलभूत गरज बनली आहे. कॉल्स, इंटरनेट, यूपीआय पेमेंट्स, काम आणि मनोरंजन अशा सर्व गोष्टी बॅटरीवर अवलंबून असतात. अशा परिस्थितीत तुमच्या फोनच्या बॅटरीची लाईफ थेट तुमच्या वापराशी संबंधित असते. तरीही, अनेक लोक चार्जिंगकडे दुर्लक्ष करतात आणि त्याच जुन्या चुका वारंवार करतात, ज्यामुळे हळूहळू बॅटरी कमकुवत होत जाते.
वस्तुस्थिती अशी आहे की, लिथियम बॅटरीची एक ठराविक 'चार्जिंग रेंज' असते. जर तुम्हाला तुमचा फोन जास्त गरम होऊ नये, बॅटरी लवकर कमी नये आणि फोन दीर्घकाळ स्मूथ चालावा असे वाटत असेल, तर फोन चार्जिंगवरून कधी काढावा आणि किती टक्क्यांपर्यंत चार्ज करणे योग्य आहे, हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे.
फोन १००% चार्ज करणं योग्य आहे का?
आजकालच्या बहुतांश स्मार्टफोनमध्ये 'लिथियम आयन' बॅटरी असते. या बॅटऱ्या अत्यंत प्रगत असतात आणि ओव्हरचार्जिंगपासून स्वतःचा बचाव करू शकतात. म्हणूनच अनेकांना वाटतं की १००% चार्जिंग केल्याने काही फरक पडत नाही. पण वास्तव हे आहे की, याचा परिणाम हळूहळू जाणवतो. जेव्हा फोन ८०% च्या पुढे १००% कडे जातो, तेव्हा बॅटरीवर जास्त ताण पडतो आणि त्यातील केमिकल प्रोसेस वेगवान होते.
जर हे रोज घडत राहिले, तर काही महिने किंवा वर्षांत बॅटरीची क्षमता कमी होऊ लागते. कधीतरी १००% चार्ज केल्याने नुकसान होणार नाही, पण ती सवय लावणं चुकीचं आहे. सध्या आयफोन (iPhone) आणि अँड्रॉइडमध्ये 'ऑप्टिमाइझ्ड' (Optimised) किंवा 'अॅडॉप्टिव्ह चार्जिंग' (Adaptive Charging) सारखी फीचर्स असतात, जी चार्जिंगचा वेग नियंत्रित करून बॅटरी सुरक्षित ठेवतात. मात्र, रोज रात्रभर फोन १००% चार्जिंगला लावून ठेवल्यास बॅटरी लवकर खराब होऊ शकते.
फोन किती टक्क्यांपर्यंत चार्ज करावा?
बॅटरी तज्ज्ञ आणि टेक कंपन्यांच्या टेस्टिंगनुसार, फोनची बॅटरी २०% ते ८०% च्या दरम्यान ठेवणे सर्वात योग्य मानलं जातं. या रेंजमध्ये बॅटरी पूर्णपणे रिकामीही नसते आणि पूर्ण भरलेलीही नसते. यामुळे बॅटरीवरचा ताण कमी होतो आणि 'चार्ज सायकल' जास्त काळ चांगली राहते. सोप्या भाषेत सांगायचं तर, ८०% चार्जिंग झाल्यावर फोन काढणं हे बॅटरीसाठी फायदेशीर आहे, तर १००% पर्यंत नेणं म्हणजे तिच्याकडून 'ओव्हरटाइम' करून घेण्यासारखं आहे. जर तुम्हाला तुमचा फोन ४ ते ५ वर्षे चांगल्या स्थितीत वापरायचा असेल, तर तो ८० ते ८५ टक्क्यांच्या आसपास चार्जिंगवरून काढण्याची सवय लावा. बॅटरी ५ ते १० टक्क्यांच्या खाली वारंवार जाऊ देऊ नका, कारण पूर्णपणे डिस्चार्ज होणंही बॅटरीसाठी चांगलं नसतं.