ओटीटी अॅप्सची काही खैर नाही! टेलिग्रामची नवी अपडेट आली; व्हिडीओ थेट टीव्हीला कास्ट करता येणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 13:02 IST2025-03-12T13:01:19+5:302025-03-12T13:02:23+5:30
Telegram Chromecast Support: टेलिग्राम हे एकप्रकारे चुकीच्या गोष्टींचे मायाजाल आहे. नवीनच लाँच झालेले सिनेमे, वेब सिरीज टेलिग्रामवरील चॅनल्सवर लीक केले जातात.

ओटीटी अॅप्सची काही खैर नाही! टेलिग्रामची नवी अपडेट आली; व्हिडीओ थेट टीव्हीला कास्ट करता येणार
टेलिग्रामने महत्वाची अपडेट जारी केली आहे. यामध्ये बऱ्याच काळापासून प्रतिक्षेत असलेल्या क्रोमकास्टचा पर्याय मिळणार आहे. म्हणजेच टेलिग्रामवर आलेले व्हिडीओ तुम्हाला सहजपणे टीव्हीवर पाहता येणार आहेत. यामुळे सिनेमे, वेब सिरीज आणि ओटीटी प्लॅटफॉर्मची पुरती वाट लागणार आहे.
टेलिग्राम हे एकप्रकारे चुकीच्या गोष्टींचे मायाजाल आहे. नवीनच लाँच झालेले सिनेमे, वेब सिरीज टेलिग्रामवरील चॅनल्सवर लीक केले जातात. ते लाखो-करोडो लोकांपर्यंत पोहोचतात. लोक ते डाऊनलोड करून पाहतात. परंतू, आतापर्यंत हे मोबाईलवरच पाहता येत होते. आता ते टीव्हीवरही पाहता येणार आहे.
टेलिग्रामवरील व्हिडीओ मोबाईलमध्ये सेव्ह करून ते व्हीएलसी, एमएक्स प्लेअर आदी क्रोमकास्ट होणाऱ्या अॅपवर उघडून पाहता येत होते. यात वेळ आणि मोबाईलची बॅटरीही खूप लागत होती. तसेच हे व्हिडीओ पुढे मागे करणे देखील सोईचे नव्हते. अनेकदा हे व्हिडीओ बंद व्हायचे किंवा कनेक्टिव्हीटी जायची. मग पुन्हा तेच तेच करत रहावे लागायचे. परंतू, आता थेट टेलिग्रामवरूनच हे व्हिडीओ कास्ट करता येणार आहेत. युजर्सच्या फायद्याचे हे फिचर्स आलेले असले तरी करोडो रुपये गुंतवून जे लोक हे सिनेमे बनवितात त्यांच्यासाठी हे फिचर तोट्याचे ठरणार आहे.
टेलिग्रामने युजरना फसवणुकीपासून वाचविण्यासाठी देखील काम केले आहे. व्हेरिफिकेशन प्लॅटफॉर्मवर सूट देण्यात आली असून याद्वारे व्यवसाय किंवा स्टार्टअप युजरसोबत कमी किंमतीत व्हेरिफाय करता येणार आहे. ग्रुप्सवर मेसेज करायचा असेल किंवा चर्चा करायची असेल तर तो विषय स्टार करून ठेवता येणार आहे. जेणेकरून नंतर वाचत असेलल्या लोकांना तो विषय समजणे सोपे जाईल. तुम्हाला अनोळखीने मेसेज पाठविला तर तुम्ही त्याला पैसेही चार्ज करू शकणार आहात. यामुळे स्पॅमर तुमच्यापासून लांब राहतील.