१ मेपासून वनप्लसचे मोबाईल शॉपीत मिळणार नाहीत; विक्रीपश्चात सेवा, वॉरंटी देण्यात कंपनी अपयशी ठरल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 17:15 IST2024-04-16T17:15:13+5:302024-04-16T17:15:33+5:30
One Plus फोन ग्राहकांना केवळ ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरच विकत घ्यावे लागणार आहेत.

१ मेपासून वनप्लसचे मोबाईल शॉपीत मिळणार नाहीत; विक्रीपश्चात सेवा, वॉरंटी देण्यात कंपनी अपयशी ठरल्याचा आरोप
वनप्लस या प्रिमिअम ब्रँडकडून भारतातील करोडो ग्राहकांना धक्कादायक बातमी येत आहे. १ मे पासून वनप्लसचे स्मार्टफोन, टॅब्लेट ऑफलाईन स्टोअर्स म्हणजेच मोबाईल शॉपींमध्ये मिळणार नाहीत. यामुळे हे फोन ग्राहकांना केवळ ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरच विकत घ्यावे लागणार आहेत.
वनप्लस आणि रिटेल स्टोअर विक्रेत्यांमध्ये वाद सुरु आहे. या वादावर तोडगा न निघाल्याने रिटेल स्टोअर संघ ORA कडून वनप्लस डिव्हाईसची विक्री १ मे पासून रोखण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कंपनी त्यांना दिलेली आश्वासने पूर्ण करू शकली नाही यामुळे ही विक्री बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे संघटनेने सांगितले आहे.
१ मे पासून आंध्रप्रदेश, तेलंगाना, तामिळनाडू, महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरातच्या जवळपास २३ रिटेल चेन आणि ४५०० स्टोअर्सवर वनप्लसचे फोन मिळू शकणार नाहीत.
वनप्लसच्या मार्जिनमधील नफ्याचे प्रमाण सातत्याने घसरत चालले आहे. यामुळे वनप्लचे फोन विकणे फाय़देशीर ठरत नाहीय. तसेच सेवा आणि वॉरंटीदेखील ग्राहकांना वेळेवर दिली जात नाही. यामुळे फोन विकलेल्या ग्राहकांकडून अनेक तक्रारी येत होत्या, असा आरोप विक्रेत्यांनी केलेला आहे. यामुळे वनप्लस आणि दुकानदारांमध्ये वाद सुरु आहेत. २०२२ च्या तुलनेत २०२४ मध्ये वनप्लसच्या फोनच्या विक्रीत 3.68 टक्क्यांवरून 4.82 टक्के एवढी वाढ झाली आहे.