एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 14:21 IST2025-12-25T14:18:52+5:302025-12-25T14:21:58+5:30
एकीकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वेगाने प्रगती करत असताना, दुसरीकडे सायबर चोरटे देखील सर्वसामान्यांना लुटण्यासाठी नवनव्या क्लृप्त्या शोधून काढत आहेत.

एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
२०२५ हे वर्ष तंत्रज्ञानाच्या बाबतीत जितकं प्रगत आहे, तितकंच ते सायबर हल्ल्यांमुळे धोकादायकही ठरत आहे. एकीकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वेगाने प्रगती करत असताना, दुसरीकडे सायबर चोरटे देखील सर्वसामान्यांना लुटण्यासाठी नवनव्या क्लृप्त्या शोधून काढत आहेत. विंडोज सिस्टिम वापरणाऱ्यांना लक्ष्य करण्यासाठी आता 'ConsentFix' नावाचा एक अत्यंत खतरनाक सायबर हल्ला समोर आला आहे. हा हल्ला इतका भयानक आहे की, तो तुमची तगडी सुरक्षा देखील सहज भेदून बँक खातं रिकामं करू शकतो.
नेमकं काय आहे 'ConsentFix' तंत्र?
सायबर सिक्युरिटी कंपनी 'Push Security'ने या नव्या फिशिंग तंत्राचा उलगडा केला आहे. हा हल्ला म्हणजे जुन्या क्लिकफिक्स तंत्राचे अधिक धोकादायक रूप आहे. यामध्ये युजरला ब्राउझरवर एक नोटिफिकेशन दाखवलं जातं, जे दिसायला अगदी अस्सल वाटतं. या नोटिफिकेशनद्वारे युजरला एखादी लिंक कॉपी-पेस्ट करायला लावली जाते आणि तिथेच खरी गफलत होते.
पासवर्ड असूनही तुमची माहिती चोरीला जाणार!
'चेक पॉइंट'च्या अहवालानुसार, या हल्ल्यात हॅकर्सना तुमच्या मायक्रोसॉफ्ट अकाउंटचा थेट ताबा मिळतो. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, जर तुम्ही तुमच्या अकाउंटला पासवर्ड किंवा 'मल्टी-फॅक्टर ऑथेंटिकेशन'सारखी सुरक्षा लावली असेल, तरीही हा अटॅक त्या भिंती सहज ओलांडतो. एकदा का तुम्ही त्यांच्या सांगण्यानुसार लिंक कॉपी-पेस्ट केली की, हॅकर्सना तुमच्या अकाउंटमध्ये शिरण्यासाठी कोणत्याही पासवर्डची गरज उरत नाही.
असा टाकला जातो जाळा!
हा स्कॅम सहसा एखाद्या 'सिक्युरिटी अलर्ट'च्या रूपात समोर येतो. तुमच्या स्क्रीनवर अचानक एक मेसेज येईल की, "तुमच्या मायक्रोसॉफ्ट अकाउंटवर सायबर हल्ला होत आहे" किंवा "तुमच्या अकाउंटमध्ये काही संशयास्पद हालचाली आढळल्या आहेत". त्यानंतर हा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी तुम्हाला काही पावलं उचलण्यास सांगितलं जातं. युजर घाबरून त्या सूचनांचं पालन करतो आणि स्वतःच आपल्या अकाउंटच्या चाव्या हॅकर्सच्या हातात देतो.
कशी घ्याल काळजी?
१. अनोळखी मेसेजवर विश्वास नको: तुमच्या सिस्टिममध्ये काही धोका आहे असा मेसेज अचानक आला आणि काही टेक्स्ट कॉपी-पेस्ट करायला सांगितलं, तर ते चुकूनही करू नका.
२. सिस्टिम रीस्टार्ट करा: असा कोणताही संशयास्पद पॉप-अप दिसल्यास घाबरून न जाता ब्राउझर बंद करा आणि कॉम्प्युटर रीस्टार्ट करा.
३. अधिकृत सूचनाच पाहा: कोणत्याही कंपनीचे सुरक्षा अपडेट्स हे त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा सिस्टिम सेटिंगमध्ये येतात, ब्राउझरमधील पॉप-अपवर नाही.
तुमची एक छोटीशी सतर्कता तुम्हाला मोठ्या आर्थिक फटक्यापासून वाचवू शकते. डिजिटल जगात सावधान राहणं हीच सर्वात मोठी सुरक्षा आहे.