Microsoft मध्ये 'या' भारतीयाकडे मोठी जबाबदारी; Ai टीमचे करणार नेतृत्व...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 19:47 IST2025-01-14T19:47:10+5:302025-01-14T19:47:55+5:30
Microsoft News : जय पारीख यांची Microsoft मध्ये महत्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

Microsoft मध्ये 'या' भारतीयाकडे मोठी जबाबदारी; Ai टीमचे करणार नेतृत्व...
Microsoft News : टेक जायंट मायक्रोसॉफ्टने थर्ट पार्टी ग्राहकांसाठी Ai ॲप्स आणि टूल्स तयार करण्यासाठी नवीन टीम तयार केली आहे. 'कोअर एआय - प्लॅटफॉर्म अँड टूल्स', असे या टीमला नाव देण्यात आले आहे. विशेष म्हणझे, या टीमचे नेतृत्व एका भारतीयाच्या खांद्यावर असेल. भारतीय वंशाचे जय पारीख (Jai Parekh) या टीमचे प्रमुख असतील. त्यांनी यापूर्वी सायबर सिक्युरिटी स्टार्टअप लेसवर्कचे सीईओ आणि मेटामध्ये प्रमुख पदावर काम केले आहे. आता मायक्रोसॉफ्टमध्ये त्यांना महत्वाची जबाबदारी मिळाली आहे.
3 वर्षात 30 वर्षांचा बदल
नवीन टीमबाबत सत्या नडेला म्हणाले की, या नवीन बदलामुळे अॅप्लिकेशन कॅटेगरीज प्रभावित होतील. पण, 3 वर्षात 30 वर्षांचा बदल अपेक्षित आहे. दरम्यान, सुमारे 10 महिन्यांपूर्वी मायक्रोसॉफ्टने डीपमाइंडचे सह-संस्थापक मुस्तफा सुलेमान यांना कोपायलट एआय मोहिमेचे नेतृत्व करण्यासाठी नियुक्त केले होते. आता पारीख सुलेमानसोबत कंपनीत एकत्र काम करणार आहेत.
ऑक्टोबरमध्ये मायक्रोसॉफ्टमध्ये रुजू
पारीख गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मायक्रोसॉफ्टमध्ये कार्यकारी उपाध्यक्ष म्हणून रुजू झाले होते. ते कंपनीच्या सीनिअर टीमचा भाग आहेत. मायक्रोसॉफ्टचे अनेक अधिकारी जय पारीख यांना रिपोर्ट करतील. यामध्ये एआय प्लॅटफॉर्म हेड एरिक बॉयड, एआय इन्फ्रास्ट्रक्चर डेप्युटी सीटीओ जेसन टेलर, मायक्रोसॉफ्ट डेव्हलपर डिव्हिजन हेड ज्युलिया लियसन इत्यादींचा समावेश आहे.
पारीख यांची कारकीर्द
व्हर्जिनिया टेक्निकल युनिव्हर्सिटीमधून शिक्षण पूर्ण केलेले जय पारीख 2009 मध्ये फेसबुक कंपनीत रुजू झाले. या काळात त्यांनी कंपनीच्या तांत्रिक पायाभूत सुविधा आणि डेटा सेंटर प्रकल्पांवर काम केले. कंपनी सोडण्यापूर्वी ते इंजीनिअरिंग टीमचे प्रमुख होते. मेटाच्या अक्विला ड्रोन प्रकल्पासह अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांवरही त्यांनी काम केले आहे. यानंतर त्यांनी लेसवर्कचे सीईओ म्हणून काम केले.