कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 16:56 IST2025-12-12T16:56:07+5:302025-12-12T16:56:24+5:30
No Camera iPhone : हा आयफोन दिसण्यास सामान्य असला तरी यात एकही कॅमेरा मॉड्यूल नाही. ॲप्पल कंपनीचेच हे ओरिजिनल आयफोन असतात, पण...

कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
'नो कॅमेरा झोन'साठी खास तयार केलेला आयफोन सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चेत आहे. हा आयफोन दिसण्यास सामान्य असला तरी यात एकही कॅमेरा मॉड्यूल नाही. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खास बनवलेल्या या 'नो कॅमेरा आयफोन' मागील रहस्य, त्याची किंमत आणि उपलब्धता याबद्दलचे सविस्तर वृत्त खालीलप्रमाणे.
जगात अनेक ठिकाणी, विशेषत: लष्करी तळ, अणुऊर्जा प्रकल्प, गुप्त प्रयोगशाळा किंवा संवेदनशील प्रकल्पांवर काम करणाऱ्या कंपन्यांमध्ये 'नो कॅमेरा झोन' घोषित केले जातात. अशा ठिकाणी कर्मचाऱ्यांनी फोनमधील कॅमेऱ्याद्वारे कोणतीही गोपनीय माहिती किंवा छायाचित्रे लीक करू नये, यासाठी हे विशेष आयफोन वापरले जातात. हॅकिंग आणि गुप्तहेरगिरीचा धोका कमी करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
ॲप्पल कंपनी बनवते का?
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल, पण ॲप्पल स्वतः असे फोन बनवत नाही. या कॅमेऱ्याविना आयफोनची निर्मिती तृतीय-पक्ष कंपन्या करतात. या कंपन्या बाजारात उपलब्ध असलेल्या आयफोनमधून कॅमेरा मॉड्यूल अत्यंत सफाईने काढून टाकतात. हे फोन केवळ विशेष शासकीय किंवा कॉर्पोरेट ऑर्डरनुसार तयार केले जातात.
सामान्य नागरिकांसाठी उपलब्ध नाही
हा 'नो कॅमेरा आयफोन' सामान्य ग्राहकांसाठी खरेदी करता येत नाही. हे डिव्हाइस फक्त मिलिटरी आणि उच्च सुरक्षा आवश्यक असलेल्या संस्थांना पुरवले जाते.
किंमत सामान्य आयफोनपेक्षा कितीतरी जास्त!
सुरक्षितता आणि विशेष मागणीमुळे, या फोनची किंमत सामान्य आयफोन मॉडेलपेक्षा खूप जास्त आहे. अहवालानुसार, कॅमेऱ्याशिवाय तयार केलेल्या iPhone SE (2020/2022) मॉडेलची किंमत $1,130 ते $1,680 (सुमारे ₹ ९४,००० ते ₹ १,४०,०००) दरम्यान असू शकते, जी त्यांच्या मूळ किमतीपेक्षा कैक पटीने अधिक आहे.