251 रुपयांमध्ये स्मार्टफोन विकणारा मोहित आठवतोय का? जाणून घ्या तो सध्या काय करतो
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 17:15 IST2021-08-25T17:14:48+5:302021-08-25T17:15:48+5:30
Mohit Goel Arrested: मोहित गोयलच्या विरोधात विकास मित्तल यांनी हत्येचा प्रयत्न, फसवणूक आणि इतर आठ गुन्हे दाखल केले आहेत. या तक्रारी नंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी मोहितला अटक केली.

251 रुपयांमध्ये स्मार्टफोन विकणारा मोहित आठवतोय का? जाणून घ्या तो सध्या काय करतो
2017 मध्ये आलेली रिंगिंग बेल कंपनी आठवतेय का? या कंपनीने 251 रुपयांमध्ये स्मार्टफोन देण्याचा दावा केला होता. कंपनीने हा स्मार्टफोन Freedom 251 नावाने मार्केट केला होता. आता या कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर मोहित गोयलला उत्तर प्रदेश पोलिसांनी पुन्हा एकदा फसवणुकीच्या आरोपाखाली अटक केली आहे. इंद्रपूरम पोलिसांनी मोहितला ग्रेटर नोयडा येथील त्याच्या राहत्या घरातून सोमवारी अटक केले.
मोहित गोयलच्या विरोधात विकास मित्तल यांनी हत्येचा प्रयत्न, फसवणूक आणि इतर आठ गुन्हे दाखल केले आहेत. या तक्रारी नंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी मोहितला अटक केली. अटकेनंतर मोहीतला न्यायालयासमोर हजार करण्यात आले. स्थानिक न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. विकास मित्तल यांनी मोहितने त्यांना 41 लाखांना फसवल्याचा आणि पैशांची विचारणा केल्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.
अनेक गुन्हे आहेत मोहित गोयलवर
मोहित गोयलच्या विरोधात फसवणूक आणि इतर गुन्ह्यांच्या 35 केसेस आहेत, अशी माहित टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे. तसेच काही वर्षांपूर्वी गाजियाबादमधील अयाम इंटरप्राइजेज कंपनीनेने रिंगिंग बेल्स विरोधात 16 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला होता. तसेच गोयलच्या दुबई ड्रायफ्रूट्स अँड स्पायसेस या कंपनी विरोधात देखील अनेक व्यापाऱ्यांनी तक्रार केली होती.
40 वर्षाच्या मोहित गोयलने 2017 मध्ये 251 रुपयांचा स्मार्टफोन देण्याचा दावा केला होता. या स्मार्टफोनमागे 31 रुपयांचा नफा होणार असल्याचा दावा देखील करण्यात आला होता. परंतु 30,000 पेक्षाही जास्त बुकिंग्स मिळवल्यावनंतर हा फोन ग्राहकांपर्यंत पोहोचला नाही. आणि फेब्रुवारी 2017 मध्ये मोहितला अटक करण्यात आली होती.