एक काळ होता...! मायक्रोसॉफ्टने अखेर निर्णय घेतलाच; २७ वर्षांचा इंटरनेट एक्सप्लोरर बंद होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 14:31 IST2022-06-13T14:31:37+5:302022-06-13T14:31:55+5:30
सरकारी एजन्सी आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधीत कंपन्या आजही या ब्राऊजरचा वापर करत होत्या. अनेक वेब बेस्ड सॉफ्टवेअर आजही इंटरनेट एक्सप्लोररवर चालतात.

एक काळ होता...! मायक्रोसॉफ्टने अखेर निर्णय घेतलाच; २७ वर्षांचा इंटरनेट एक्सप्लोरर बंद होणार
मायक्रोसॉफ्टने अखेर धापा टाकणाऱ्या इंटरनेट एक्सप्लोरर ब्राऊजरला बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या २७ वर्षांपासून हा ब्राऊजर सुरु होता. तो येत्या 15 जून 2022 पासून बंद करण्यात येणार आहे. धक्कादायक बाब म्हणजे आज इंटरनेट वापरणारे करोडो, अब्जावधीमध्ये युजर आहेत, तरी आयईटा वापर करणारे ५ टक्केच युजर होते.
इंटरनेट एक्सप्लोरर हा 2003 पर्यंत टॉपवर होता. परंतू, नंतर गुगल क्रोम, मॉझिला आणि अन्य ब्राऊजरशी स्पर्धेत मागे पडला तो कायमचा. जेव्हा इंटरनेट एक्सप्लोरर लाँच झालेला तेव्हा खुप कमी जणांकडे इंटरनेट असायचे. या ब्राऊजरमुळे लोकांच्या समस्या दूर झाल्या आणि काम करणे सोपे झाले होते. पोलिसांना रेकॉर्ड्स शोधण्यात, विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यामध्ये या ब्राऊजरने मोठी भूमिका निभावलेली.
बाजारात ऑर्कुटसारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आले आणि जसजसा इंटरनेटचा वेग वाढला तसतसा याचा वापरही वाढला. सरकारी एजन्सी आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधीत कंपन्या आजही या ब्राऊजरचा वापर करत होत्या. अनेक वेब बेस्ड सॉफ्टवेअर आजही इंटरनेट एक्सप्लोररवर चालतात. 16 ऑगस्ट 1995 मध्ये हा ब्राऊजर पहिल्यांदा लाँच झाला होता. सायबर कॅफेमध्ये देखील इंटरनेट एक्सप्लोररचाच वापर सर्वाधिक होत होता. आता सायबर कॅफेदेखील विलुप्त झाले आहेत.
असे असले तरी देखील मायक्रोसॉफ्ट ब्राऊजर क्षेत्रात असणार आहे. इंटरनेट एक्सप्लोरर जरी बंद झाला तरी युजर माइक्रोसॉफ्ट एज (Microsoft Edge) चा वापर करू शकतात. तो डाऊनलोड करून लीगल व्हर्जन वापरू शकतात. कंपनीने यामध्ये वेग आणि इनबिल्ट प्रायव्हसी आणि सिक्युरिटीचा दावा केला आहे.