Lokmat AI ची अद्भूत दुनिया: एआय मॉडेल म्हणजे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 20:49 IST2026-03-24T20:49:01+5:302026-03-24T20:49:01+5:30

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: एआय मॉडेल कसं काम करतं, हे समजून घेणं विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे.

lokmat ai series what is an artificial intelligence ai model | Lokmat AI ची अद्भूत दुनिया: एआय मॉडेल म्हणजे काय?

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: एआय मॉडेल म्हणजे काय?

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: आजचे जग वेगाने बदलत आहे. मोबाइल फोन, इंटरनेट, स्मार्ट टीव्ही, डिजिटल शिक्षण, ऑनलाइन परीक्षा, अगदी शेती आणि आरोग्य क्षेत्रात सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता वापरली जात आहे. पण एआय हे नेमकं काय आहे आणि त्यामागे असलेलं एआय मॉडेल कसं काम करतं, हे समजून घेणं विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे.

एआय मॉडेल म्हणजे काय?

एआय मॉडेल म्हणजे संगणकाला दिलेले असे विशेष प्रशिक्षण, ज्यामुळे तो पाहू शकतो, ऐकू शकतो, वाचू शकतो, विचार करू शकतो आणि निर्णय घेऊ शकतो. जसं एखादं मूल वाचन करून, निरीक्षण करून, अनुभवातून शिकत जातं, तसाच एआय सुद्धा डेटामधून शिकतो. उदाहरणार्थ, आपण एखाद्या एआयला हजारो फळांचे फोटो दाखवले जसे, सफरचंद, केळी, आंबा इत्यादी थोड्या काळानंतर एआय नवीन फोटो पाहून सांगतो, "हे सफरचंद आहे." म्हणजेच त्याला मागील फोटोवरून कल्पना येते, अशा प्रकारचा निर्णय घेण्याची क्षमता म्हणजेच एआय मॉडेल.

एआय मॉडेल कसा तयार होतो?

एआय मॉडेल तयार होणं म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला पायरी-पायरीने म्हणजेच स्टेप-बाय-स्टेप शिकवण्यासारखं असतं. आपण त्याचे काही टप्पे बघूयात.

पहिला टप्पा - डेटा गोळा करणे 

एआयला शिकवण्यासाठी मोठ्या प्रमाणात माहिती म्हणजेच डेटा लागतो. या माहितीला डेटा म्हणतात.

उदा. विद्यार्थ्यांचे निकाल, हवामानाची नोंद, रस्त्यावरील वाहनांचे फोटो, भाषण, लेख, पुस्तके इत्यादी हाच डेटा हा एआयचा गुरू असतो.

दुसरा टप्पा - डेटा स्वच्छ करणे 

सगळा डेटा बरोबरच असेल असं नाही. त्यामध्ये चुकीची माहिती. अपूर्ण नोंदी. आणि गोंधळ निर्माण करणारा डेटा असू शकतो. हाच डेटा दुरुस्त केला जातो. कारण चुकीच्या माहितीवर शिकलेला एआय चुकीचेच निर्णय घेतो.

तिसरा टप्पा - एआयला प्रशिक्षण देणे.

हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे. एआयला योग्य आणि अयोग्य उदाहरणे दाखवली जातात. उदा - हे योग्य उत्तर आहे. हे चुकीचे उत्तर आहे. अशी अनेक उदाहरणे आहेत. हजारो वेळा सराव केल्यानंतर एआय स्वतः शिकतो. यालाच प्रशिक्षण म्हणतात.

चौथा टप्पा - चाचणी घेणे.

एआय खरोखर शिकला आहे का, हे तपासले जाते. नवीन प्रश्न, नवीन फोटो, नवीन माहिती देऊन एआयची परीक्षा घेतली जाते. जर चुका जास्त असतील, तर पुन्हा प्रशिक्षण दिले जाते. जसं विद्यार्थ्यांना पुन्हा अभ्यास करावा लागतो, तसंच एआयला सुद्धा.

पाचवा टप्पा - वापरात आणणे.

एआय मॉडेल तयार झाल्यानंतर तो प्रत्यक्ष वापरात आणला जातो.

उदा. शैक्षणिक अॅप्स, बँकिंग सिस्टीम, आरोग्य तपासणी, शेतीतील हवामान अंदाज, ट्रॅफिक नियंत्रण इत्यादी. आज आपण जे स्मार्ट अॅप्स वापरतो, त्यामागे एआय मॉडेलच काम करत असते.

विद्यार्थ्यांसाठी एआय का महत्त्वाचा आहे?

एआय हे भविष्यातील तंत्रज्ञान नाही, ते आजचं वास्तव आहे.

आजचा विद्यार्थी जर तंत्रज्ञान समजून घेत असेल आणि प्रश्न विचारत असेल, नवनवीन कौशल्ये शिकत असेल तर उद्या तो एआयचा वापर करणारा नव्हे, तर एआय तयार करणारा नागरिक बनेल यात शंका नाही.

What is an Al Model?

An Al model is a computer system trained with data to think, learn, and make decisions like humans.

Moral - Be curious, keep learning. Technology grows with those who understand it.

निष्कर्ष

एआय मॉडेल म्हणजे कोणतीही जादू नाही. तो माणसाने दिलेल्या माहितीवर, योग्य मार्गदर्शनवर आणि सततच्या सरावावर तयार झालेला हुशार संगणकीय मेंदू आहे.

विद्यार्थ्यांनी आजच एआयबद्दल कुतूहल ठेवले, तर उद्याचे जग समजून घेणे त्यांच्यासाठी नक्कीच सोपे आणि सोयीचे होईल.

- अविनाश जाधव, एआय आणि टेक एज्युकेटर.
 

Web Title : लोकमत एआई की अद्भुत दुनिया: छात्रों के लिए एआई मॉडल को समझना

Web Summary : एआई विभिन्न क्षेत्रों को बदल रहा है। एक एआई मॉडल डेटा से सीखता है, जिससे कंप्यूटर सोचने और निर्णय लेने में सक्षम होते हैं। एआई मॉडल बनाने में डेटा संग्रह, सफाई, प्रशिक्षण और परीक्षण शामिल हैं। भविष्य के लिए छात्रों को एआई को समझना और नवाचार करना महत्वपूर्ण है।

Web Title : Lokmat AI's Amazing World: Understanding AI Models for Students

Web Summary : AI is transforming various sectors. An AI model learns from data, enabling computers to think and decide. Creating an AI model involves data collection, cleaning, training, and testing. AI is crucial for students to understand and innovate for the future.