Lokmat AI ची अद्भूत दुनिया: तंत्रज्ञानाचा नवा कल्पवृक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 11:15 IST2026-03-03T11:15:59+5:302026-03-03T11:15:59+5:30
Lokmat AI ची अद्भूत दुनिया: या लेखातून आपण या भविष्याच्या गुरुकिल्लीचा वेध घेणार आहोत.

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: तंत्रज्ञानाचा नवा कल्पवृक्ष
Lokmat AI ची अद्भूत दुनिया: तुम्ही कधी विचार केला आहे का की, तुमच्या फोनला तुमची आवडती गाणी कशी माहिती असतात? किंवा आपण गुगलवर काही शोधायला लागलो की, ते लगेच आपल्याला हवे ते उत्तर कसे मिळते? ही कोणतीही जादू नसून, हे आहे 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' (AI) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता. एकेकाळी केवळ विज्ञानकथा किंवा चित्रपटांत दिसणारे हे तंत्रज्ञान आता आपल्या खिशात आणि घराघरांत पोहोचले आहे. या लेखातून आपण या भविष्याच्या गुरुकिल्लीचा वेध घेणार आहोत.
'एआय' म्हणजे नक्की काय?
सोप्या भाषेत सांगायचे तर, एआय म्हणजे यंत्रांना दिलेली मानवी बुद्धिमत्ता. ज्याप्रमाणे आपण अनुभव आणि अभ्यासातून शिकतो, तसेच एआय तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात डेटा (माहिती) गोळा करून त्यातून शिकते आणि नमुने (Patterns) ओळखते. उदाहरणार्थ, तुम्ही जेव्हा एखाद्या रोबोटला फुटबॉल खेळायला शिकवता, तेव्हा सुरुवातीला तो अनेक चुका करतो; पण प्रत्येक चुकीतून शिकत तो शेवटी एक उत्तम खेळाडू बनतो. हीच शिकण्याची प्रक्रिया म्हणजे एआय.
'एआय'चा रंजक इतिहास
एआयचा प्रवास खूप जुना आहे. १९५० च्या दशकात अॅलन ट्युरिंग या शास्त्रज्ञाने या संकल्पनेची मुहूर्तमेढ रोवली. पुढे १९५६ मध्ये जॉन मॅकार्थी यांनी 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' असा शब्दप्रयोग पहिल्यांदा केला. मधल्या काळात काही काळ या संशोधनाचा वेग मंदावला होता, ज्याला 'एआय विंटर' म्हटले जाते. मात्र, १९९७ मध्ये जेव्हा आयबीएमच्या 'डीप ब्लू' संगणकाने बुद्धिबळ चॅम्पियन गॅरी कास्पारोवला हरवले, तेव्हा जगाला या तंत्रज्ञानाची खरी ताकद समजली. २०२५ मध्ये आपण जेमिनी-३ आणि जेमा-३ सारख्या प्रगत मॉडेल्सपर्यंत येऊन पोहोचलो आहोत, जे माणसासारखा विचार करू शकतात.
महाराष्ट्र आणि भारत : प्रगतीचे केंद्र
आपला भारत एआयच्या क्षेत्रात मोठी आ झेप घेत आहे. २०२५ मध्ये गुगलने विशाखापट्टणममध्ये आपले एआय हब सुरू केले आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रात कर्जत (जि. रायगड, मुंबईजवळ) येथे देशातील पहिली 'एआय युनिव्हर्सिटी' साकारत आहे. राज्यातील आदिवासी शाळांमध्ये मुलांच्या पोषणाची तपासणी करण्यासाठीही एआयचा वापर केला जात आहे, ही अभिमानास्पद बाब आहे.
नैतिकता आणि जबाबदारी
एआयचे जितके फायदे आहेत, तितकीच काही आव्हानेही आहेत. चुकीची माहिती (Deepfakes) पसरवणे किंवा आपली खासगी माहिती (Privacy) धोक्यात येणे असे धोके संभवतात. म्हणूनच, युनेस्कोने काही मार्गदर्शक तत्त्वे आखून दिले आहेत, ज्यानुसार एआयचा वापर मानवी हितासाठी आणि सुरक्षिततेसाठीच झाला पाहिजे.
भविष्याकडे झेप
२०३० पर्यंत एआय आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग असेल. हे तंत्रज्ञान आत्मसात करणे ही काळाची गरज आहे. एआय हे भविष्यातील कल्पवृक्ष आहे; जर आपण त्याचा जबाबदारीने आणि नैतिकतेने वापर केला, तर हे जग नक्कीच अधिक सुंदर आणि प्रगत होईल. चला तर मग, या नवीन तंत्रज्ञानाशी मैत्री करू या आणि भविष्यातील नेतृत्व करण्यासाठी सज्ज होऊ या !
एआयचे विविध प्रकार : नॅरो ते सुपर
१. नॅरो एआय : हे एआय फक्त एका विशिष्ट कामात निपुण असते, जसे की बुद्धिबळ खेळणे किंवा नेटफ्लिक्सवर चित्रपट सुचवणे.
२. जनरल एआय : हे माणसाप्रमाणे विविध कामे करु शकते. हे अजूनही विकासाच्या टप्प्यात आहे.
३. सुपर एआय : ही अशी कल्पना आहे जिथे यंत्रे माणसापेक्षाही जास्त बुद्धिमान होतील.
दैनंदिन जीवनातील क्रांती
एआय प्रत्येक क्षेत्राला स्पर्श करत आहे.
शिक्षण : महाराष्ट्रात २०२५ मध्ये नवी एआय धोरण लागू झाली आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना वैयक्तिक शिक्षक (Al Tutor) मिळणे सोपे होणार आहे.
आरोग्य : डॉक्टरांना रोग ओळखण्यात एआय मोठी मदत करत आहे. २०२३ मध्ये चक्क २२३ एआय-सक्षम वैद्यकीय उपकरणांना मंजुरी देण्यात आली आहे.
शेती : महाराष्ट्रातील शेतकरी माती आणि हवामानाचे विश्लेषणासाठी एआयचा वापर करत आहेत.
भाषा : 'भाषिणी' सारख्या व्यासपीठामुळे भाषेची भिंत उरलेली नाही. एआयमुळे सहज अनुवाद करु शकतो.
प्रा. योगीराज विश्वनाथ चंद्रात्रे, सी. डी. जैन वाणिज्य महाविद्यालय, श्रीरामपूर