Lenovo tops on tablet sales | टॅबलेट विक्रीत लेनोव्हो अव्वल
टॅबलेट विक्रीत लेनोव्हो अव्वल

भारतीय बाजारपेठेत तिसर्‍या तिमाहीत अर्थात जुलै ते सप्टेबर दरम्यान विक्री झालेल्या टॅबलेटच्या आकडेवारीवरून सीएमआर या मार्केट रिसर्च संस्थेने सादर केलेल्या अहवालात लेनोव्हो कंपनी आघाडीवर असल्याचे अधोरेखित झाले आहे. वास्तविक पाहता टॅबलेट विक्रीत सातत्याने घट होत आहे. स्मार्टफोनचा वाढता प्रसार आणि त्यातही मोठे स्क्रीन असणारे फॅब्लेट दाखल झाल्यापासून टॅबलेटच्या विक्रीत सातत्याने घट होत आहे. या वर्षाचा विचार केला तर भारतीय बाजारपेठेत टॅबलेटची विक्री गेल्या वर्षापेक्षा तब्बल ४ टक्क्यांनी घटली आहे. मात्र जुलै ते सप्टेबर या तिमाहीत मात्र टॅबलेट विक्रीत वाढ झाली आहे. या तिमाहीत देशात एकूण ९.४० लाख टॅबलेट विकले गेलेत. आधीच्या तिमाहीपेक्षा हा आकडा ३८ टक्क्यांनी जास्त आहे. यात लेनोव्हो कंपनीचा सर्वाधीक म्हणजे २०.३ टक्के वाटा आहे. विशेष म्हणजे आधीच्या तिमाहीपेक्षा लेनोव्होच्या विक्रीत तब्बल ९४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यात लेनोव्हो टॅब ३ या मॉडेलचा सर्वाधीक वाटा आहे. हा ७ इंची टॅबलेट मोठ्या प्रमाणात विकला गेला आहे. यातच ऑगस्ट महिन्यात सुरू झालेली 'नमो ई-टॅब टॅबलेट सहाय्य योजना' देखील या कंपनीला लाभदायक ठरली आहे. यामुळे लेनोव्होने टॅबलेट विक्री अव्वल स्थान प्राप्त केले आहे.

दरम्यान, १६ टक्के मार्केट शेअरसह एसर कंपनी या तिमाहीत दुसर्‍या स्थानी असल्याचे सीएमआरच्या आकडेवारीतून समोर आले आहे. तर १५.५ टक्के वाट्यासह डाटाविंड ही कंपनी तिसर्‍या स्थानावर आहे.  तर सीएमआरच्या या अहवालानुसार गत तिमाहीत फोर-जी, थ्री-जी आणि वाय-फाय मॉडेल्समध्ये अनुक्रमे  ५३, ५४ आणि २२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र २-जी मॉडेलमध्ये १५ टक्क्यांनी घट झालेली आहे. ऑपरेटींग सिस्टीम्सचा विचार केला असता अँड्रॉइड या प्रणालीचा तब्बल ९२ टक्के वाटा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
 


Web Title: Lenovo tops on tablet sales
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.