itel Rhythm Echo TWS Earbuds: बॅटरी लाईफही हवी, आजुबाजुचा गोंगाट घालविणारा इअरबड हवा, मग...; हा बजेटमधील इअरबड कसा आहे...?
By हेमंत बावकर | Updated: December 4, 2025 14:01 IST2025-12-04T13:59:45+5:302025-12-04T14:01:59+5:30
itel Rhythm Echo TWS Earbuds review: संगीत ऐकण्यासाठी, फोनवर बोलण्यासाठी, गेमिंगसाठी आम्ही हा इअरबड वापरून पाहिला, जाणून घ्या आम्हाला कसा वाटला, त्याची किंमत आदी...

itel Rhythm Echo TWS Earbuds: बॅटरी लाईफही हवी, आजुबाजुचा गोंगाट घालविणारा इअरबड हवा, मग...; हा बजेटमधील इअरबड कसा आहे...?
परवडणाऱ्या किंमतीत दर्जेदार स्मार्टफोन बनवणाऱ्या आयटेल कंपनीने नुकताच Rhythm Echo TWS Earbuds भारतीय बाजारात लाँच केला. हा इअरबड कमी किंमतीत येत असला तरी त्याची डिझाईन आकर्षक आहे आणि तो कानाला आरामदायक बसतो. आम्ही हा इअरबड बराच काळ वापरला, तरी कान दुखणे किंवा अवघड वाटणे अशी कोणतीही समस्या जाणवली नाही. इअरबडवरच टच कंट्रोल देण्यात आले आहेत, ज्यामुळे कॉल घेणे/कट करणे किंवा संगीत नियंत्रित करणे सोपे होते. एवढ्या कमी किमतीत हे फीचर्स मिळत आहेत.
बॅटरी आणि चार्जिंग पॉवर
कंपनीने दावा केल्याप्रमाणे या इअरबडला ५० तासांपर्यंतची बॅटरी लाईफ आहे. आमच्या दैनंदिन वापरामध्ये (दिवसाचे ३ ते ४ तास) हा इअरबड आम्हाला तब्बल दीड आठवड्यांहून अधिक काळ बॅटरी बॅकअप देत होता आणि तरीही काही दिवसांचा चार्ज शिल्लक होता. स्कूटर चालविताना, चालताना किंवा व्यायामाच्या वेळी सतत बाहेर वापरणाऱ्यांसाठी इतका दमदार बॅटरी बॅकअप हा एक प्लस पॉईंट ठरतो.
कॉलिंग आणि गोंगाटातील कामगिरी (Quad Mic ENC)
आजकाल कामाच्या निमित्ताने अनेकजण बाहेर असतात आणि त्याचवेळी महत्त्वाचे फोन येतात. गोंगाटाच्या ठिकाणी फोनवर बोलणे हे एक आव्हान असते. या इअरबडमध्ये चार ENC (Environmental Noise Cancellation) माईक्स देण्यात आले आहेत.
वाहतुकीच्या वेळी किंवा सिग्नलवर गाड्यांचा गोंगाट असतानाही आम्ही हे इअरबड वापरले. समोरच्या व्यक्तीला आमचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. वाऱ्याचा किंवा आजूबाजूच्या गोंगाटाचा आवाज खूप कमी होऊन जात असल्याने कॉलिंगची पातळी उत्कृष्ट राहिली. हा Rhythm Echo चा सर्वात मोठा यूएसपी आहे.

साऊंड क्वालिटी (संगीत आणि गेमिंग)
संगीत अनुभव
यामध्ये १०mm चे ड्रायव्हर्स देण्यात आले आहेत, ज्यामुळे संगीत ऐकण्याचा अनुभव संतुलित मिळतो. वाद्यांचा आवाज स्पष्ट आणि चांगला लागतो. मात्र, आम्ही यापूर्वी ऐकत असलेल्या गाण्यांच्या तुलनेत गायकांचा आवाज किंचितसा बदललेला किंवा वेगळा जाणवत होता. तरीही, कानांना त्रास होईल अशी कोणतीही समस्या यात जाणवली नाही. तसेच, स्मार्टफोन आणि इअरबड्समध्ये सिंक्रोनायझेशन खूप चांगले होते, मध्येच आवाज तुटणे किंवा जाणे असे जाणवले नाही.
गेमिंग आणि व्हिडिओ
कमी किमतीच्या इअरबड्समध्ये लो लॅटेन्सी (Low Latency) हे वैशिष्ट्य सहसा नसते, ज्यामुळे गेमिंग किंवा व्हिडिओ पाहताना आवाज आणि व्हिज्युअलमध्ये फरक जाणवतो. परंतु, Rhythm Echo मध्ये केवळ ४५ मिलीसेकंदची अल्ट्रा-लो लॅटेन्सी देण्यात आली आहे. गेमिंग आणि व्हिडिओ स्ट्रीमिंगचा अनुभव यामुळे चांगला मिळतो.