तासनतास चार्जिंगला लावूनही फोन स्लो चार्ज होतोय? तुम्ही 'या' चुका तर करत नाही ना? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 18:51 IST2026-01-21T18:46:21+5:302026-01-21T18:51:20+5:30
अनेकांची तक्रार असते की, त्यांचा फोन फास्ट चार्जिंगला सपोर्ट करत असूनही बॅटरी चार्ज व्हायला खूप वेळ लागतो. जर तुमच्यासोबतही असे घडत असेल, तर....

तासनतास चार्जिंगला लावूनही फोन स्लो चार्ज होतोय? तुम्ही 'या' चुका तर करत नाही ना? जाणून घ्या
आजकालच्या धावपळीच्या युगात कोणाकडेही मोबाईल चार्जिंगसाठी तासनतास वाट पाहण्या इतका वेळ नाही. म्हणूनच कंपन्या आता ६०W, ८०W किंवा त्याहून अधिक 'फास्ट चार्जिंग'चे तंत्रज्ञान देत आहेत. मात्र, अनेकांची तक्रार असते की, त्यांचा फोन फास्ट चार्जिंगला सपोर्ट करत असूनही बॅटरी चार्ज व्हायला खूप वेळ लागतो. जर तुमच्यासोबतही असे घडत असेल, तर कदाचित तुम्ही नकळत काही मोठ्या चुका करत आहात. या चुका केवळ चार्जिंगचा वेगच कमी करत नाहीत, तर तुमच्या फोनच्या बॅटरीचे आयुष्यही धोक्यात आणतात.
नकली अडॅप्टरचा वापर टाळा : अनेकांना सवय असते की, ओरिजनल चार्जर खराब झाला की मार्केटमधून स्वस्त मिळणारा कोणताही चार्जर विकत घेतात. हे डुप्लिकेट चार्जर फोन चार्ज तर करतात, पण त्यांचा व्होल्टेज स्थिर नसतो. यामुळे चार्जिंगचा वेग प्रचंड मंदावतो आणि फोनची बॅटरी लवकर फुगण्याची किंवा खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे नेहमी ओरिजनल किंवा चांगल्या ब्रँडच्या कंपॅटिबल अडॅप्टरचाच वापर करा.
केबलची लांबी आणि गुणवत्ता : केवळ चार्जरचा प्लग चांगला असून चालत नाही, तर तुमची चार्जिंग केबलही दर्जेदार असणे आवश्यक आहे. स्वस्त केबल्स पूर्ण वीजप्रवाह फोनपर्यंत पोहोचवू शकत नाहीत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, केबल जितकी जास्त लांब असेल, तितका चार्जिंगचा वेग कमी होतो, कारण लांबीमुळे सिग्नल्समध्ये अडथळा येतो. त्यामुळे शक्यतो लहान आणि हाय-क्वालिटी केबल वापरा.
तापमानाचा चार्जिंगवर परिणाम : तुमचा फोन कुठे चार्ज होत आहे, यावरही वेग अवलंबून असतो. जर तुम्ही फोन थेट उन्हात किंवा गरम जागी चार्जिंगला लावला, तर फोन ओव्हरहीट होतो. आजकालचे स्मार्टफोन्स गरम झाल्यावर सुरक्षेसाठी चार्जिंगचा वेग आपोआप कमी करतात. त्यामुळे फोन नेहमी थंड आणि सावलीच्या जागीच चार्ज करा.
चार्जिंग करताना फोन वापरण्याची चूक : अनेकांना चार्जिंग सुरू असताना गेम खेळण्याची किंवा सोशल मीडिया वापरण्याची सवय असते. यामुळे फोनची बॅटरी एकाच वेळी चार्जही होत असते आणि खर्चही होत असते. या प्रक्रियेत फोन प्रचंड तापतो आणि चार्जिंगचा वेग निम्म्यावर येतो. फोन लवकर चार्ज करायचा असेल, तर चार्जिंग दरम्यान त्याचा वापर करणे टाळा.
बॅक कव्हर काढून ठेवा : फास्ट चार्जिंगमुळे फोन नैसर्गिकरित्या थोडा गरम होतो. अशा वेळी जर फोनवर जाड बॅक कव्हर असेल, तर उष्णता बाहेर पडू शकत नाही. यामुळे फोन अधिक गरम होऊन चार्जिंग स्लो होते. शक्य असल्यास चार्जिंगच्या वेळी कव्हर काढून ठेवल्यास फोन अधिक वेगाने चार्ज होण्यास मदत होते.