लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 16:29 IST2025-11-06T16:29:14+5:302025-11-06T16:29:46+5:30
अनेकदा लॅपटॉप उघडला की त्यावर भरपूर धूळ बसलेली दिसते. अशावेळी आपण टिश्यू पेपर अथवा एखादा कपडा घेऊन लॅपटॉपची स्क्रीन पुसू लागतो. मात्र, असं करणं चूक आहे.

लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
लॅपटॉप हा आपल्या रोजच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. कामाच्या निमित्ताने आपण रोज लॅपटॉप उघड-बंद करतो. अनेकदा लॅपटॉप उघडला की त्यावर भरपूर धूळ बसलेली दिसते. अशावेळी आपण टिश्यू पेपर अथवा एखादा कपडा घेऊन लॅपटॉपची स्क्रीन पुसू लागतो. मात्र, असं करणं चूक आहे. लॅपटॉपची स्क्रीन अत्यंत नाजूक असल्यामुळे, तिची साफसफाई करताना कठोर रसायने किंवा जास्त दाब वापरल्यास तिचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे, तुमचा लॅपटॉप पुन्हा लखलखीत दिसावा यासाठी, तो साफ करताना काही गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे.
लॅपटॉपच्या स्क्रीनची साफसफाई सुरू करण्यापूर्वी दोन गोष्टींकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. सर्वप्रथम, लॅपटॉपला पॉवर सोर्समधून काढा आणि तो पूर्णपणे बंद करा. जर, लॅपटॉप नुकताच वापरून बंद केला असेल आणि गरम असेल, तर त्याला पूर्ण थंड होऊ द्या. गरम स्क्रीन पुसल्यास ती खराब होण्याची शक्यता जास्त असते.
'या' टिप्सने काम होईल सोपे
> तुमच्या लॅपटॉपवर असलेल्या डागांनुसार तुम्ही योग्य साधने वापरू शकता. स्क्रीनवरील सामान्य धूळ आणि हलके डाग काढण्यासाठी मायक्रोफायबर कापडाचा वापर करा. हे कापड अत्यंत मऊ असल्याने स्क्रीनवर ओरखडे पडत नाहीत.
> जर स्क्रीनवर काही चिकट आणि जुने डाग असतील, तर मायक्रोफायबर कापडावर थोडे डिस्टिल्ड वॉटर घेऊन हळूवारपणे पुसा. साधे नळाचे पाणी वापरणे टाळा, कारण त्यात क्षार असू शकतात.
> याव्यतिरिक्त, कॉर्नर आणि कडांना अडकलेली धूळ काढण्यासाठी एअर कॉम्प्रेसरचा काळजीपूर्वक वापर करा.
> तुम्ही लॅपटॉपसाठी बनवलेल्या क्लिनिंग वाइप्सचा पर्याय देखील निवडू शकता. साफसफाई पूर्ण झाल्यावर, लॅपटॉप पुन्हा सुरू करण्यापूर्वी स्क्रीन पूर्णपणे कोरडी झाली आहे, याची खात्री करा.
तुम्ही 'या' चुका तर करत नाहीत ना? त्वरित थांबवा!
लॅपटॉप स्क्रीन नाजूक असल्याने, काही वस्तू वापरणे कटाक्षाने टाळले पाहिजे. पेपर टॉवेल किंवा टिश्यू पेपर वापरू नका, कारण त्यांचे तंतू स्क्रीनवर बारीक ओरखडे पाडू शकतात. तसेच, अल्कोहोल किंवा अमोनिया आधारित क्लीनर वापरणे टाळा. हे कठोर रसायन स्क्रीनवरील संरक्षक थर काढून टाकू शकतात. याशिवाय, क्लीनिंग लिक्विड कधीही थेट स्क्रीनवर स्प्रे करू नका. हे द्रव कडांमधून आत जाऊन अंतर्गत सर्किट्स बिघडवू शकते, ज्यामुळे लॅपटॉपचे मोठे नुकसान होते.
लॅपटॉपला घाण होण्यापासून वाचवण्याचे सोपे उपाय
वारंवार साफसफाई करण्याची गरज भासू नये म्हणून काही साध्या सवयी लावणे महत्त्वाचे आहे. लॅपटॉप बंद करताना, स्क्रीन आणि कीबोर्डच्या मध्ये एक पातळ मायक्रोफायबर कापड ठेवल्यास धूळ आणि तेलाचे कण जमा होत नाहीत. दीर्घकाळ लॅपटॉपचा वापर नसेल, तेव्हा तो सुरक्षित केसमध्ये किंवा स्लीव्हमध्ये झाकून ठेवा. तसेच, लॅपटॉपजवळ खाणे किंवा पेयपदार्थ ठेवणे टाळा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, स्क्रीनवर बोटांचे ठसे उमटू नयेत म्हणून तिला वारंवार स्पर्श करणे टाळा. या सोप्या नियमांचे पालन केल्यास तुमच्या लॅपटॉपची स्क्रीन नेहमी चमकदार राहील.