देशातील 95 टक्के खेड्यांमध्ये इंटरनेटची सुविधा; गेल्या 10 वर्षांत 70 कोटी मोबाईल युजर्स वाढले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 17:34 IST2024-08-02T17:34:05+5:302024-08-02T17:34:21+5:30
Internet Connections in India: 'डिजिटल इंडिया' उपक्रमांतर्गत देशातील 95 टक्के खेड्यांमध्ये 3G किंवा 4G इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे.

देशातील 95 टक्के खेड्यांमध्ये इंटरनेटची सुविधा; गेल्या 10 वर्षांत 70 कोटी मोबाईल युजर्स वाढले...
Internet Connections in India :केंद्र सरकारच्या 'डिजिटल इंडिया' उपक्रमांतर्गत देशातील 95 टक्के खेड्यांमध्ये 3G किंवा 4G इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे. केंद्र सरकारने शुक्रवारी संसदेत ही माहिती दिली. केंद्रीय दळणवळण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात (मार्च 2024) सध्या एकूण 95.44 कोटी इंटरनेट युजर्स आहेत, त्यापैकी 39.83 कोटी ग्रामीण भारतातील आहेत.
मंत्रालयाने पुढे सांगितले की, देशातील एकूण 6,44,131 पैकी 6,12,952 खेड्यांमध्ये (एप्रिल 2024) 3G/4G मोबाईल इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे. म्हणजेच, देशातील 95.15 टक्के गावांमध्ये इंटरनेट सुविधा आहे. 'डिजिटल इंडिया' उपक्रमांतर्गत, सरकारने मेट्रो, टियर-2 आणि टियर-3 शहरे, तसेच ग्रामीण आणि दुर्गम भागांना जोडण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत.
आकडा 25.15 कोटींवरुन 95.44 कोटी झाला
मागील एका दशकात देशातील एकूण मोबाइल ग्राहकांची संख्या 25.15 कोटींवरुन 95.44 कोटी झाली आहे. वार्षिक आधारावर 14.26 टक्के CAGR ची वाढ झाली आहे. गेल्या 10 वर्षात देशाच्या कानाकोपऱ्यात दूरसंचार नेटवर्कचा विस्तार करण्यात आल्याचेही सरकारने सांगितले.
सीमावर्ती भागात मोबाईल टॉवर लावण्याच्या नियमात बदल
ग्रामीण भागात इंटरनेट ब्रॉडबँड सुविधा देण्यासाठी सरकारने 'भारतनेट' प्रकल्प सुरू केला. देशातील सर्व ग्रामपंचायतींना ऑप्टिकल फायबर केबलने जोडणे, हा त्याचा उद्देश होता. सरकारने सांगितले की 2.2 लाख ग्रामपंचायतींपैकी 2.13 लाख ग्रामपंचायती भारतनेटशी जोडल्या गेल्या आहेत. ऑगस्ट 2022 मध्ये सरकारने सीमावर्ती भागात मोबाईल टॉवर बसवण्याच्या नियमात बदल केला होता, जेणेकरून अधिकाधिक लोकांना मोबाईल इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देता येईल.