सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 15:48 IST2026-04-12T15:48:35+5:302026-04-12T15:48:57+5:30
इन्स्टाग्रामने किशोरवयीन मुलांच्या सुरक्षिततेसाठी नवीन नियम लागू केले आहेत. आता पालकांना मुलांच्या कंटेंट आणि सर्चवर नियंत्रण ठेवता येणार आहे.

सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
आजच्या डिजिटल युगात किशोरवयीन मुले तासनतास इन्स्टाग्रामवर घालवतात. मात्र, या प्लॅटफॉर्मवर त्यांना काय दिसते आणि ते कोणाशी संवाद साधतात, याची चिंता पालकांना सतावत असते. आता पालकांची ही चिंता दूर करण्यासाठी 'मेटा'ने इन्स्टाग्रामवर अत्यंत कडक नियम लागू केले आहेत. नवीन बदलांनुसार, आता किशोरवयीन मुलांच्या प्रत्येक हालचालीवर एआय आणि पालकांची नजर असणार आहे.
१३+ रेटिंगसारखाच मिळणार अनुभव
इन्स्टाग्रामने आता स्पष्ट केले आहे की, किशोरवयीन युजर्सना केवळ त्यांच्या वयाला साजेसा म्हणजेच '१३+' रेटिंग असलेल्या चित्रपटांप्रमाणेच कंटेंट दाखवला जाईल. आक्षेपार्ह व्हिडिओ, भडक पोस्ट आणि अयोग्य अकाउंट्सवर प्लॅटफॉर्म स्वतःहून मर्यादा आणणार आहे. ही सेटिंग 'डिफॉल्ट' स्वरूपात लागू असेल, म्हणजेच मुले स्वतःहून ती बंद करू शकणार नाहीत.
काय आहेत नवीन फिचर्स?
लिमिटेड कंटेंट मोड: पालकांना आता आपल्या पाल्यासाठी कंटेंटचे स्वरूप ठरवता येईल. यामध्ये हिंसाचार, धोकादायक स्टंट्स, अंमली पदार्थ किंवा मद्यपानाला प्रोत्साहन देणाऱ्या पोस्ट पूर्णपणे ब्लॉक केल्या जातील.
सर्चवर बंदी: मुले आता काही संवेदनशील शब्द सर्च करू शकणार नाहीत. इतकेच नाही तर शब्दांचे स्पेलिंग बदलूनही आक्षेपार्ह गोष्टी शोधणे अशक्य होणार आहे.
मेसेज आणि फॉलोवर मर्यादा: चुकीचा कंटेंट शेअर करणाऱ्या अकाउंट्सना मुले फॉलो करू शकणार नाहीत. जर असे अकाउंट आधीच फॉलो केले असेल, तर त्यांचे मेसेज किंवा कमेंट्स मुलांच्या फीडवर दिसणार नाहीत.
एआय करणार फिल्टरिंग
मार्क झुकरबर्ग यांच्या कंपनीने आता अत्याधुनिक एआय तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. हे तंत्रज्ञान आक्षेपार्ह मजकूर काही सेकंदात ओळखून तो फिल्टर करेल. तसेच, चॅटमध्ये एआयच्या माध्यमातून मिळणारी उत्तरे मुलांसाठी सुरक्षित असतील, याचीही काळजी घेतली जाईल.
पालकांना का मिळाला मोठा अधिकार?
इन्स्टाग्रामच्या या निर्णयामुळे पालकांचा प्लॅटफॉर्मवर विश्वास वाढणार आहे. मुलांच्या ऑनलाइन सुरक्षिततेसाठी सिस्टिम शंभर टक्के परफेक्ट नसली, तरी पालकांच्या नियंत्रणामुळे धोके मोठ्या प्रमाणात कमी होतील, असा दावा कंपनीने केला आहे. पालकांना आता आपल्या मुलांच्या स्क्रीन टाइमवर आणि त्यांच्या डिजिटल वागणुकीवर पूर्णपणे लक्ष ठेवता येणार आहे.