भारतामधील स्मार्टफोन बाजारात १.७ टक्के घसरण; उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 06:52 IST2021-02-24T00:57:33+5:302021-02-24T06:52:53+5:30
उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण

भारतामधील स्मार्टफोन बाजारात १.७ टक्के घसरण; उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण
नवी दिल्ली : अनेक वर्षांच्या वृद्धीनंतर भारतीय स्मार्टफोन बाजारात २०२० मध्ये प्रथमच १.७ टक्क्यांची घसरण झाली आहे. २०२१ हे वर्ष मात्र स्फार्ट फोन बाजारासाठी आशादायक राहील, असा अंदाज आहे.
गेल्यावर्षी कोविड-१९ लॉकडाऊनमुळे लोक घरीच होते. तरीही वर्क फ्रॉम होम, घरूनच सुरू झालेल्या शाळा यांचा थोडा लाभ बाजाराला झाला. मात्र प्रवासावरील मर्यादा आणि वस्तू उत्पादन क्षेत्रातील टाळेबंदी याचा फटका बाजाराला बसला. लाखो लोक बेरोजगार झाल्यामुळे मागणीत मोठी घट झाली. त्याचा प्रचंड फटका स्मार्ट फोन विक्रीला बसला, अशी माहिती इंटरनॅशनल डाटा कॉर्पोरेशनच्या (आयडीसी) अहवालात देण्यात आली आहे.
अहवालात म्हटले आहे की, २०२० मध्ये एकूण १५० दशलक्ष स्मार्ट फोन विकले गेले. वार्षिक आधारावर विक्रीत १.७ टक्के घसरण झाली आहे. २०२० च्या पहिल्या सहामाहीत स्मार्टफोनची मागणी २६ टक्क्यांनी घसरली. दुसऱ्या सहामाहीत मात्र मागणीत १९ टक्के सुधारणा झाली. अहवालात म्हटले आहे की, २०२० च्या शेवटी मागणीत झालेली मोठी वाढ २०२१ साठी आशेचा किरण घेऊन आली आहे. हे वर्ष स्मार्टफोन बाजारासाठी चांगले राहील, असा अंदाज आहे. त्यामुळे उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.