भारतात ई-पासपोर्ट डिलिव्हरीस सुरुवात! जून २०२५ पर्यंत पूर्ण बदलणार, जुन्या पासपोर्टधारकांचे काय...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 16:13 IST2025-11-18T16:12:15+5:302025-11-18T16:13:00+5:30
देशातील नागरिकांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. भारताने आता नेक्स्ट जनरेशन ई- पासपोर्ट जारी करण्यास सुरुवात केली आहे, ...

भारतात ई-पासपोर्ट डिलिव्हरीस सुरुवात! जून २०२५ पर्यंत पूर्ण बदलणार, जुन्या पासपोर्टधारकांचे काय...
देशातील नागरिकांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. भारताने आता नेक्स्ट जनरेशन ई-पासपोर्ट जारी करण्यास सुरुवात केली आहे, ज्यात अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत. परदेशात प्रवास करणाऱ्या प्रत्येक नागरिकांसाठी ही सुविधा जून २०२५ पर्यंत पूर्णपणे लागू करण्याची केंद्र सरकारची योजना आहे.
या नव्या ई-पासपोर्टमध्ये सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे यात एक हाय-टेक RFID चिप बसवलेली आहे. ही चिप प्रवाशाचे एन्क्रिप्टेड बायोमेट्रिक्स डेटा आणि इतर वैयक्तिक माहिती सुरक्षितपणे साठवून ठेवेल. कॉन्टॅक्टलेस डेटा रीडिंग क्षमतेमुळे, इमिग्रेशन काउंटरवर व्हेरिफिकेशनसाठी लागणारा वेळ लक्षणीयरीत्या कमी होणार आहे.
फ्रॉड आणि फसवणूक रोखणे होणार सोपे
परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा नवा ई-पासपोर्ट फ्रॉड आणि बनावटगिरी रोखण्यास मदत करेल. एकाच व्यक्तीकडे एकापेक्षा जास्त पासपोर्ट असण्याच्या घटनांनाही या नवीन प्रणालीमुळे आळा बसेल. याशिवाय, पासपोर्टच्या छपाईतही 'इंटर-लॉकिंग मायक्रो-लेटर्स' आणि 'रिलीफ टिंट्स' सारखे सुरक्षा तंत्रज्ञान वापरले गेले आहे.
८० लाख ई-पासपोर्ट जारी
सध्या रोलआउट सुरू असून, आतापर्यंत भारतात ८० लाखांहून अधिक ई-पासपोर्ट जारी झाले आहेत. नवा पासपोर्ट मिळवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आता ई-पासपोर्टच दिला जाईल, तर जुने नॉन-इलेक्ट्रॉनिक पासपोर्ट त्यांच्या मुदतीपर्यंत वैध राहतील.
AI आणि डिजिटल इंटिग्रेशन
सरकारने PSP V2.0 आणि ग्लोबल व्हर्जन GPSP V2.0 अंतर्गत या सेवेत मोठे बदल केले आहेत. नागरिकांना उत्तम अनुभव मिळावा यासाठी नवीन प्रणालीत AI चॅटबॉट आणि व्हॉईस बॉट ॲप्लिकेशन्सचा समावेश करण्यात आला आहे. तसेच, कागदपत्रांच्या पडताळणीसाठी ही प्रणाली आधार, पॅन आणि डिजीलॉकरशी देखील जोडली जाईल. परदेश प्रवासाची तयारी करणाऱ्या आणि जलद, सुरक्षित प्रवासाची अपेक्षा करणाऱ्या प्रत्येक भारतीयासाठी हा बदल अत्यंत महत्त्वाचा आहे.