मोबाइल गेमिंगवर जास्त वेळ घालवताहेत भारतीय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2018 11:32 IST2018-12-17T11:31:50+5:302018-12-17T11:32:27+5:30
काही वर्षांपूर्वी व्हिडीओ गेम खेळणारे लोक हे कम्प्युटरवर गेम खेळायचे. पण आता लोक सहजपणे मोबाइलवर हवे ते गेम खेळू लागले आहेत.

मोबाइल गेमिंगवर जास्त वेळ घालवताहेत भारतीय!
काही वर्षांपूर्वी व्हिडीओ गेम खेळणारे लोक हे कम्प्युटरवर गेम खेळायचे. पण आता लोक सहजपणे मोबाइलवर हवे ते गेम खेळू लागले आहेत. याचं सर्वात मुख्य कारण म्हणजे स्मार्टफोन आणि कमी खर्चात मिळणारं इंटरनेट. त्यामुळे भारतातील लोक मोबाइलवर गेम खेळण्यात सरासरी एका तासांपेक्षा जास्त वेळ घालवत आहेत. हा आकडा व्हिडीओ स्ट्रिमींग प्लॅटफॉर्मसारख्या जसे की, नेटफ्लिक्सपेक्षा ४५ मिनिटांनी जास्त आहे.
भारतात वाढली गेम खेळणाऱ्यांची संख्या
मोबाइल मार्केटिंग असोसिएशन पॉवर ऑफ मोबाइल गेमिंग इन इंडियाच्या रिपोर्टनुसार, भारतात चारपैकी तीन व्यक्ती मोबाइलवर दिवसातून दोनदा गेम खेळतात. रिपोर्टमध्ये हेही सांगण्यात आलं आहे की, २५ कोटी गेमर्स या आकड्यासह भारत मोबाइल गेम खेळणाऱ्या जगातल्या टॉप ५ देशांच्या यादीत सहभागी झाला आहे. ही आकडेवारी पाहून हे लक्षात येतं की, याच वेगाने जर गेम खेळणाऱ्यांची संख्या वाढली तर काही वर्षातच भारत गेम खेळणाऱ्यांच्या यादीत टॉपवर येईल.
PUBG वाढली क्रेझ
मोबाइल गेम्स आल्यामुळे भारतीय आता प्राइम टाईममध्ये टीव्ही कमी बघू लागले आहेत आणि लोकांना सायंकाळी ७ वाजेपासून ते रात्री उशीरापर्यंत मोबाइलवर गेम खेळताना पाहिले गेले आहे. मोबाइल गेम PUBG ने या आकडेवारीत भर घालण्याचं काम केलं आहे. मार्चमध्ये लॉन्च झालेल्या या गेमने जगभरातील गेमर्ससह भारतीयांमध्येही लोकप्रियता मिळवली. जाना ब्राऊजरकडून करण्यात आलेल्या एका सर्वेनुसार, १, ०४७ लोकांपैकी ६२ टक्के लोकांनी सांगितले की, ते PUBG खेळतात. याबाबत जास्तीत जास्त यूजर्सचं म्हणणं आहे की, या गेममुळे भारतासोबतच जगभरातील लोकांसोबत जुळण्याचं एक चांगलं माध्यम आहे.
टूर्नामेंट आणि थीम पार्टींचं आयोजन
PUBG ची क्रेझ किती वाढली आहे याची वेगवेगळी उदाहरणे बघायला मिळत आहेत. चेन्नईच्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने नुकतील त्यांच्या विद्यार्थ्यांवर PUBG खेळण्यावर बंदी घातली आहे. भारतात आता या गेमवर टूर्नामेंटचं आयोजन केलं जात आहे. इतकेच नाही तर दिल्लीत या गेमवर आधारित एका थीम पार्टीचंही आयोजन करण्यात आलं होतं.
आता तर तरुण मंडळी दिवसरात्र हा गेम खेळत असल्याने त्यांना याची सवय लागली आहे. हा गेम आत्तापर्यंत ५० मिलियनपेक्षाही जास्त लोकांनी डाऊनलोड केला आहे. या आकडेवारीवरुनच या गेमची लोकप्रियता बघितली जाऊ शकते.
तज्ज्ञ सांगतात की, या गेममुळे लहान मुलं हिंसक होत आहेत. कारण या गेमची कॉन्सेप्टच सर्वांचा नाश करुन राजा होणं आहे. याचा प्रभाव लहान मुलांवर बघायला मिळतो आहे. या गेममुळे लहान मुलांना सवय तर लागलीच आहे. पण त्यांच्या व्यवहारातही यामुळे मोठा बदल दिसतो आहे.
PUBG गेममध्ये वेगवेगळे हायटेक फीचर देण्यात आले आहेत. या ऑनलाइन गेममध्ये आकर्षक ग्राफिक्स, दमदार साऊंड आणि मोशन सेंसरिंग टेक्नॉलॉजीचाही वापर करण्यात आला आहे. फार कमी वेळात या गेमने मोठी लोकप्रियता मिळवली. पण याने अनेकांना आपल्या जाळ्यात घेतलं आहे.