किती धोक्याची? सॅमसंगची स्मार्ट रिंग बॅटरी फुगली, बोटात खुपली; वापरकर्ता विमानतळावरून थेट हॉस्पिटलमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 16:09 IST2025-10-01T16:06:58+5:302025-10-01T16:09:13+5:30
Samsung's smart ring battery: सॅमसंगच्या गॅलक्सी स्मार्ट रिंगची बॅटरी सुजल्यामुळे एका युट्यूबरला रुग्णालयात दाखल व्हावे लागले. जाणून घ्या या घटनेचे कारण आणि भविष्यात घ्यावयाची काळजी.

किती धोक्याची? सॅमसंगची स्मार्ट रिंग बॅटरी फुगली, बोटात खुपली; वापरकर्ता विमानतळावरून थेट हॉस्पिटलमध्ये
सॅमसंगच्या गॅलॅक्सी स्मार्ट रिंगने एका तंत्रज्ञान प्रेमीला भयानक अनुभव दिला आहे. टेक क्रिएटर डॅनियल हा सॅमसंगची रिंग वापरत होता. या रिंगची बॅटरी अचानक फुगली आणि बोटामध्ये घुसू लागली. यामुळे त्याला विमानतळावरून थेट हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले.या घटनेने सोशल मीडियावर खळबळ उडाली असून, सॅमसंगने याबाबत माफी मागितली आहे. परंतू, हा व्यक्ती आता पुन्हा असली रिंग घालणार नाही असे म्हणत आहे.
डॅनियल विमानात बसणार होता. त्याच्या बोटात सॅमसंगची हेल्थ अपडेट देणारी रिंग होती. अचानक रिंगच्या आतल्या भागाची बॅटरी फुगली, यामुळे त्याला तीव्र वेदना होऊ लागल्या. ही रिंग काढता येत नव्हती. विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी त्याला विमानात जाण्यास मनाई केली आणि लगेचच हॉस्पिटलला हलविले. तोवर त्याचे बोट सुजले होते. बर्फाच्या मदतीने सूज कमी करून तसेच लुब्रिकंट लावून ही रिंग डॅनियलच्या बोटातून काढण्यात आली.
डॅनियलने सोशल मीडियावर हा थरारक अनुभव सांगितला आहे. सुरुवातीला साबण आणि हातक्रीम वापरून रिंग काढण्याचा प्रयत्न केला, पण यामुळे सूज आणखी वाढली. हे कसे घडले हे समजतच नाही, पण मी कधीच अशी रिंग घालणार नाही, असे डॅनियलने म्हटले आहे. या घटनेमुळे वेअरेबल डिव्हाईसेसच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. सॅमसंग गॅलॅक्सी स्मार्ट रिंग ही कंपनीची नवीन लॉन्च केलेली वेअरेबल डिव्हाईस आहे, जी आरोग्य ट्रॅकिंग आणि फिटनेस मॉनिटरिंगसाठी डिझाइन केली आहे. मात्र, बॅटरी फुगण्याची ही समस्या तंत्रज्ञान क्षेत्रात चर्चेत आली असून, यापूर्वी इतर ब्रँड्सच्या स्मार्टवॉचेसमध्येही अशा समस्या नोंदवल्या गेल्या आहेत. तज्ज्ञांच्या मते, लिथियम-आयन बॅटरींच्या ओव्हरचार्जिंग किंवा डिफेक्टिव्ह डिझाइनमुळे असे घडू शकते.
Ahhh…this is…not good.
— Daniel (@ZONEofTECH) September 29, 2025
My Samsung Galaxy Ring’s battery started swelling. While it’s on my finger 😬. And while I’m about to board a flight 😬
Now I cannot take it off and this thing hurts.
Any quick suggestions @SamsungUK@SamsungMobileUS? pic.twitter.com/LOO1kSlQUw
सॅमसंगची प्रतिक्रिया
सॅमसंगने तात्काळ प्रतिक्रिया देत डॅनियलशी थेट संपर्क साधला आणि माफी मागितली. कंपनीने म्हटले की, "आम्हाला या प्रकाराबाबत खेद वाटतो आणि आम्ही याची तपासणी करत आहोत."