BSNL च्या 9 कोटी ग्राहकांसाठी खुशखबर; लवकरच सुरू होणार 5G सेवा, मुंबई-दिल्लीपासून सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 15:17 IST2025-10-06T15:17:07+5:302025-10-06T15:17:41+5:30
अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बीएसएनएलच्या 4G सेवांचा शुभारंभ केला होता.

BSNL च्या 9 कोटी ग्राहकांसाठी खुशखबर; लवकरच सुरू होणार 5G सेवा, मुंबई-दिल्लीपासून सुरुवात
सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएल (BSNL) आपल्या ग्राहकांना लवकरच मोठे सरप्राईज देणार आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पुष्टी केली की, बीएसएनएलचे सर्व 4G टॉवर पुढील 6 ते 8 महिन्यांत 5G मध्ये अपग्रेड केले जातील. यानंतर BSNL युजर्सनाही Jio, Airtel आणि Vi प्रमाणेच सुपरफास्ट इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा आनंद मिळणार आहे.
BSNL ची 5G कडे वाटचाल
अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बीएसएनएलच्या 4G सेवांचा शुभारंभ केला होता. या अंतर्गत कंपनीने 1 लाख नवीन 4G मोबाइल टॉवर एकाच वेळी सुरू केले, ज्यामुळे देशभरात बीएसएनएलची 4G सेवा कार्यान्वित झाली. कंपनी आणखी 1 लाख टॉवर उभारण्याची तयारी करत आहे. यासोबतच, 5G सेवांचा सॉफ्ट लॉन्च या वर्षाच्या अखेरीस, म्हणजे डिसेंबरपर्यंत दिल्ली आणि मुंबईत होण्याची शक्यता आहे.
‘मेक इन इंडिया’वर आधारित तंत्रज्ञान
केंद्रीय मंत्री सिंधिया यांनी एका परिषदेत सांगितले की, भारतातील 4G सेवा पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित आहे. बीएसएनएलचा 4G नेटवर्क C-DOT, तेजस नेटवर्क्स आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) यांच्या संयुक्त प्रयत्नांनी विकसित करण्यात आले आहे. या कामगिरीमुळे भारत जगातील त्या पाच देशांपैकी एक बनला आहे, ज्यांनी पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित दूरसंचार नेटवर्क विकसित केले आहे.
भारत के हर कोने तक अब पहुंचेगी BSNL स्वदेशी 4G कनेक्टिविटी!
— BSNL India (@BSNLCorporate) October 5, 2025
BSNL स्वदेशी 4G नेटवर्क – 26,000+ गाँवों को जोड़ता, आत्मनिर्भर भारत को सशक्त बनाता।@DoT_India#BSNL4G#SwadeshiNetwork#DigitalBharat#Swadeshi4G#ConnectingBharatpic.twitter.com/2GsSwvfo5I
22 महिन्यांत तयार झाला स्वदेशी 4G स्टॅक
सिंधिया यांनी सांगितले की, बीएसएनएलसाठी हा प्रकल्प सोप्पा नव्हता. स्वदेशी 4G स्टॅक तयार करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. पण केवळ 22 महिन्यांत TCS मध्ये कोर सॉफ्टवेअर, रेडिओ अॅक्सेस नेटवर्क (RAN) आणि भारतीय सिस्टम इंटिग्रेटर तयार करण्यात यश आले.
देशभरात वेगाने पसरतंय नेटवर्क
सध्या देशभरात 92,564 स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित बीएसएनएल मोबाइल टॉवर कार्यान्वित झाले आहेत. भारत जगातील सर्वात वेगाने 5G सेवा सुरू करणारा देश ठरला आहे, आणि आता 99.8% जिल्ह्यांमध्ये 5G सेवा पोहोचली आहे. बीएसएनएलचं 5G नेटवर्क “आत्मनिर्भर भारत” या मोहिमेतील एक नवं पर्व ठरणार आहे. कंपनीचे विद्यमान 4G नेटवर्क पूर्णपणे 5G-रेडी असल्याने, 5G लॉन्चसाठी फार वेळ लागणार नाही.