फ्रीचं वायफाय पडेल महागात! सार्वजनिक वाय-फाय वापरणाऱ्यांना गुगलने दिला मोठा इशारा; कनेक्ट कराल तर..
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 18:53 IST2025-11-13T18:52:47+5:302025-11-13T18:53:44+5:30
सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध असलेलं पब्लिक वाय-फाय वापरणाऱ्यांमध्ये तुम्हीही असाल, तर वेळीच सावध व्हा!

फ्रीचं वायफाय पडेल महागात! सार्वजनिक वाय-फाय वापरणाऱ्यांना गुगलने दिला मोठा इशारा; कनेक्ट कराल तर..
रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट, कॅफे किंवा शॉपिंग मॉल्स... अशा सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध असलेलं पब्लिक वाय-फाय वापरणाऱ्यांमध्ये तुम्हीही असाल, तर वेळीच सावध व्हा! तंत्रज्ञान क्षेत्रातील महाकाय कंपनी गुगलने आता सार्वजनिक वाय-फाय वापरणाऱ्यांसाठी थेट गंभीर धोक्याचा इशारा जारी केला आहे. गुगलचे म्हणणे आहे की, हे पब्लिक वाय-फाय नेटवर्क्स पूर्णपणे असुरक्षित असतात आणि सायबर गुन्हेगारांसाठी लोकांना त्यांच्या जाळ्यात ओढण्याची ही एक मोठी संधी ठरते.
पब्लिक वाय-फाय म्हणजे सायबर क्रिमिनल्सला 'आयती संधी'
गुगलने नुकत्याच जारी केलेल्या 'Android: Behind the Screen' रिपोर्टमध्ये या धोक्याचा विशेष उल्लेख केला आहे. सायबर क्रिमिनल्स पब्लिक वाय-फायच्या असुरक्षित नेटवर्कचा फायदा घेतात. या माध्यमातून ते लोकांचे बँक खात्याचे लॉग-इन डिटेल्स, खासगी डेटा आणि गोपनीय गप्पांचे संदेश यांसारखी संवेदनशील माहिती अगदी सहज चोरू शकतात. मोबाईलवरील फसवणुकीचे प्रमाण वाढत असताना, पब्लिक वाय-फायचा वापर अधिक धोकादायक ठरत आहे.
गुगलचा स्पष्ट इशारा
गुगलने आपल्या रिपोर्टमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की, काही महत्त्वाच्या गोष्टी करताना चुकूनही पब्लिक वाय-फायचा वापर करू नका. यामध्ये बँकिंग व्यवहार, ऑनलाइन शॉपिंग, आर्थिक किंवा वैयक्तिक माहिती असलेले अकाउंट्स एक्सेस करणे यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, कंपनीने यूजर्सना काही महत्त्वाच्या गोष्टींची खबरदारी घेण्यास सांगितले आहे.
मोबाईलमधील 'ऑटो-कनेक्ट' सेटिंग नेहमी डिसेबल ठेवा. कोणत्याही नेटवर्कशी कनेक्ट करण्यापूर्वी ते एनक्रिप्टेड असल्याची खात्री करून घ्या.
सायबर गुन्ह्यात जगाचे मोठे नुकसान!
गुगलचा हा इशारा अशा वेळी आला आहे, जेव्हा देश आणि जगात सायबर गुन्ह्यांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. गुगलच्या रिपोर्टनुसार, मोबाईल स्कॅम आता एक जागतिक अंडरग्राउंड इंडस्ट्री बनली आहे. यामुळे लोकांचे आर्थिक नुकसान तर होतेच, पण भावनिक नुकसानही मोठ्या प्रमाणात होते. मागील एका वर्षात जगभरात सायबर गुन्ह्यांमुळे सुमारे ४०० बिलियन डॉलर इतके मोठे नुकसान झाले आहे आणि त्यातील केवळ काही भागच परत मिळवता आला आहे.
टेक दिग्गजांचे म्हणणे आहे की, आता सायबर गुन्हेगार पूर्णपणे संघटित झाले आहेत आणि एका व्यवसायाप्रमाणे त्यांचे ऑपरेशन चालवत आहेत. चोरी झालेले फोन नंबर खरेदी करण्यापासून ते खोटे डिलिव्हरी अलर्ट पाठवण्यापर्यंत अनेक मार्गांनी ते लोकांना गंडा घालत आहेत. त्यामुळे पब्लिक वाय-फाय वापरण्यापूर्वी हजारदा विचार करा आणि आपल्या गोपनीय माहितीचे संरक्षण करा.