फेसबुक बिटकॉईनसारखी क्रिप्टोकरन्सी आणणार; जगभरातील 28 कंपन्यांचा सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2019 13:50 IST2019-06-19T13:49:21+5:302019-06-19T13:50:02+5:30
जिनिव्हामध्ये लिब्रा नावाचे एक ना नफा ना तोटा या तत्वावरील संघटना नवीन चलनाचे कामकाज पाहणार आहे.

फेसबुक बिटकॉईनसारखी क्रिप्टोकरन्सी आणणार; जगभरातील 28 कंपन्यांचा सहभाग
नवी दिल्ली : फेसबुक आपली क्रिप्टोकरन्सी बाजारात आणण्याची तयारी करत आहे. सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकने मंगळवारी बिटकॉईनसारखे नवीन डिजिटल चलन आणण्याच्या योजनेची घोषणा केली आहे. फेसबुकसह जवळपास दोन डझन कंपन्यांनी एकत्र येत नवीन चलन लिब्राचे प्रतिकृतीचे अनावरण केले.
जिनिव्हामध्ये लिब्रा नावाचे एक ना नफा ना तोटा या तत्वावरील संघटना नवीन चलनाचे कामकाज पाहणार आहे. हीच संघटना नवीन चलनाच्या मूल्यावर आधारित जगभरातील वास्तविक चलनांचा संचय करणार आहे, यामागे लिब्रा चलनाला स्थैर्य लाभावे असा उद्देश आहे.
लिब्रा असोसिएशनचे धोरण आणि संपर्क प्रमुख डेंट डिस्पार्टे यांनी सांगितले की, नवीन डिजिटल चलन हे जगभरातील बँकिंग सुविधेपासून वंचित लोकांना ई-कॉमर्स आणि आर्थिक सेवा पुरविणार आहे. लिब्रा असोसिएशनने 28 सदस्यांसोबत काम करण्यास सुरुवात केली आहे.
डेबिट, क्रेडिट कार्ड पुरविणाऱ्या कंपन्या सहभागी
लिब्रा संघटनेमध्ये देश-विदेशातील बँकांना क्रेडीट, डेबिट कार्ड पुरविणाऱ्या कंपन्यांचा समावेश आहे. मास्टरकार्ड, व्हिसा, स्टिप, पेपल, किवा, उबर आणि जागतिक महिला बँकेचाही सहभाग आहे. फेसबुक देखील या संघटनेचा सदस्य आहे. मात्र, फेसबुक नवीन डिजिटल वॉलेट कॅलिब्रा देखिल बनवत आहे.