'Nvidia चे तंत्रज्ञान वापरले', चायनीज DeepSeek Ai बाबत इलॉन मस्कचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 18:25 IST2025-01-28T18:25:05+5:302025-01-28T18:25:30+5:30
Elon Musk On DeepSeek AI: डीपसीकच्या तांत्रिक दाव्यांबाबत फसवणुकीचे आरोपही सुरू झाले आहेत.

'Nvidia चे तंत्रज्ञान वापरले', चायनीज DeepSeek Ai बाबत इलॉन मस्कचा मोठा दावा
Elon Musk On DeepSeek AI: स्वस्त AI R1 आणून मायक्रोसॉफ्ट, गुगल, मेटा, एनव्हीडिया आणि ओपन एआयसारख्या जगातील मोठमोठ्या टेक कंपन्यांना हादरवणाऱ्या चायनीज स्टार्टअप DeepSeek च्या दाव्यांबाबत आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. डीपसीकच्या तांत्रिक दाव्यांवर फसवणुकीचे आरोपदेखील होत आहेत. कमी किमतीत ओपन सोर्स एआय उपलब्ध करून देण्याचा दावा एआय क्षेत्रात वादाचा विषय बनला आहे. आता टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनीही या वादात उडी घेतली आहे.
इलॉन मस्कने X वर पोस्ट केले की, DeepSeek ने कदाचित त्यांच्या AI मध्ये 50,000 Nvidia Hopper GPUs वापरले आहेत. हे 10,000 A100s GPUs वापरण्याच्या DeepSeek च्या दाव्यांच्या विरुद्ध आहे. स्केल Ai चे सीईओ अलेक्झांडर वांग यांनीही दावा केला आहे की, डीपसीकच्या Ai मध्ये एनव्हीडिया H 100 जीपीयू तंत्रज्ञानाचा वापर झाला आहे.
DeepSeek ने दोन महिन्यांत Ai मॉडेल तयार केल्याचा दावा
हे ओपन सोर्स एआय मॉडेल तयार करण्यासाठी फक्त दोन महिने लागल्याचा दावा चायनीज स्टार्टअप डीपसीकने केला आहे. विशेष म्हणजे, हे मॉडेल तयार करण्यासाठी 6 मिलियन डॉलर्सपेक्षा कमी खर्च आल्याचा दावा केला जातोय. तर दुसरीकडे, मायक्रोसॉफ्ट, गुगल, मेटा, आणि ओपन एआयसारख्या कंपन्यांना त्यांचे Ai मॉडेल तयार करण्यासाठी अनेक वर्षे आणि अब्जो रुपयांचा खर्च आला आहे. त्यामुळेच इतक्या कमी खर्चात Ai मॉडेल तयार केल्याच्या दाव्यावरही अनेक तज्ञ प्रश्न उपस्थित करत आहेत.