ड्रोन उद्योग घेणार कोट्यवधींची उड्डाणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2020 04:57 IST2020-01-01T04:57:28+5:302020-01-01T04:57:43+5:30
ड्रोनचा वापर गेल्या पाच वर्षांत अनेक पटींनी वाढला

ड्रोन उद्योग घेणार कोट्यवधींची उड्डाणे
‘ड्रोन’ला कधी काळी खेळणे म्हटले जात होते, पण आता या तंत्रज्ञानाची झेप कोट्यवधी रुपयांच्या इंडस्ट्रीत झाली आहे. विशेषत: सरकारी उपयोग सुरू झाल्यापासून ड्रोनचा वापर गेल्या पाच वर्षांत अनेक पटींनी वाढला आहे. फिकीच्या अहवालानुसार पुढच्या दोन वर्षांत भारतातली ड्रोनची बाजारपेठ ८८.५७ कोटी अमेरिकी डॉलर्सवर पोहोचण्याची चिन्हे आहेत.
फ्लाइंग मिनी रोबोट्स किंवा ‘अनमॅन्ड एरियल व्हेइकल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ड्रोन्सची लोकप्रियता गेल्या पाच वर्षांत वाढलेली दिसते. मनुष्य जिथे पोहोचू शकत नाहीत, तिथे ड्रोन पोहोचत असल्याने खास करून मिलिटरी, संरक्षण, तसेच व्यावसायिक कारणांसाठी ड्रोन्सचा वापर वाढला आहे. हवाई छायाचित्रण एवढ्यापुरताच ड्रोन्सचा वापर आता मर्यादित राहिलेला नाही, तर औषधे-भोजनाचे वितरण, शेती, जिओग्राफिक मॅपिंग, सर्च अँड रेस्क्यू आॅपरेशन यांसारख्या शंभरपेक्षा जास्त कारणांसाठी ड्रोन आताच वापरले जात आहे. शेतांमध्ये खते देण्यासाठी आॅटोमेटिक पद्धतीचे ड्रोन कसे परिणामकारक वापरता येतील, याच्या चाचण्या सुरू आहेत. वाहतूक नियंत्रण, अपघात-नैसर्गिक आपत्ती आदींमध्ये ड्रोन कसे वापरता येतील, याची चाचपणी सुरू आहे. एकूणच माणसाचा जीव धोक्यात न घालता जोखमीची कामे करण्यासाठी भविष्यात ड्रोनचा वापर वाढणार आहे. एकट्या अमेरिकेत येत्या पाच वर्षांत केवळ ड्रोनमुळे दहा लाख नवे रोजगार निर्माण होणार आहेत. अमेरिकी अर्थव्यवस्थेला ड्रोनमुळे चालना मिळणार असून, अमेरिकेतील ड्रोन इंडस्ट्री तब्बल ८२ अब्ज डॉलर्सवर पोहोचेल, असा अंदाज असोसिएशन फॉर अनमॅन्ड व्हेइकल सिस्टम्स इंटरनॅशनल संस्थेने व्यक्त केला आहे.
अर्थात, इतर अनेक तंत्रज्ञानाप्रमाणे ड्रोनच्या बाबतीतही भारत पश्चिमी देशांकडे डोळे लावून बसला आहे. सध्याचे ड्रोन तंत्रज्ञान सहाव्या जनरेशनचे आहे. ‘जनरेशन-७’ प्रगतिपथावर आहे. ३-डीरोबोटिक्सने ‘सोलो’ या जगातील पहिल्या स्मार्ट ड्रोनची घोषणा केलेली आहे. या ड्रोन्समध्ये सेफगार्ड, स्मार्ट अॅक्युरेट सेन्सर्स, सेल्फ मॉनिटरिंग यांसारख्या अनेक बाबींचा समावेश असणार आहे.
ड्रोन व्यवहारांवर भारतात डायरेक्टोरेट जनरल आॅफ सिव्हिल एव्हिएशन नजर ठेवून आहे. आॅनलाइन अन्नपुरवठा करणाºया कंपन्यांना शहरांमध्ये ‘फूड डिलिव्हरी’साठी ड्रोनचा वापर करायचा आहे. त्यासाठीच्या चाचण्या चालू आहेत. मात्र, प्रत्यक्षात हा वापर सुरू होण्यासााठी येणाºया वर्षातला उत्तरार्ध उजाडेल, असे दिसते. सध्या ड्रोनचा ४२.९ टक्के उपयोग फोटो काढण्यासाठी, २०.७ टक्के वापर बांधकाम क्षेत्रात, १०.९ टक्के वापर युटिलिटी साठी होतो. कमर्शियल आणि सिव्हिलियन ड्रोनचा वापर येत्या वर्षभरात १९ टक्क्यांनी वाढणार आहे. ड्रोनचे विविध वापर लक्षात घेता मोबाइलप्रमाणेच ड्रोन उद्योग येत्या काळात बहरल्यास आश्चर्य वाटायला नको.