सायबर फ्रॉडला बसणार आळा; सरकारने लॉन्च केले नवीन ॲप, घरबसल्या करा तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 20:17 IST2025-01-17T20:16:50+5:302025-01-17T20:17:46+5:30
दूरसंचार विभागाने लोकांच्या सोयीसाठी हे ॲप लॉन्च केले आहे.

सायबर फ्रॉडला बसणार आळा; सरकारने लॉन्च केले नवीन ॲप, घरबसल्या करा तक्रार
DoT on Cyber Fraud : सायबर गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी दूरसंचार विभागाने (DoT) संचार साथी नावाचे नवीन ॲप लॉन्च केले आहे. या ॲपद्वारे ऑनलाइन फसवणुकीपासून ते फोन हरवण्यापर्यंतच्या तक्रारी मोबाइलवरच नोंदवता येणार आहेत. हे ॲप सुरू झाल्यानंतर रिपोर्ट करण्याची प्रक्रिया आणखी सुलभ झाली आहे. यापूर्वी फोन चोरी आणि फेक कॉलची तक्रार करण्यासाठी संचार साथीच्या वेबसाइटवर जावे लागायचे, मात्र आता मोबाइल फोनवरुन तक्रार करता येणार आहे.
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Sindhiya) यांनी संचार साथी ॲप लॉन्च करताना सांगितले की, या ॲपद्वारे देशातील लोक सुरक्षित राहतील आणि गोपनीयताही राखली जाईल. हे अॅप्लिकेशन गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअरवरुन डाउनलोड केले जाऊ शकते.
SANCHAR SAATHI APP is now LIVE!
— DoT India (@DoT_India) January 17, 2025
Scan for your digital safety today and access essential tools at your fingertips!#SancharSaathiMobileApppic.twitter.com/TNKhRHUE4O
फेक मेसेज आणि कॉल्सबद्दल तक्रार करता येणार
या ॲपवरवरु तुम्ही तुमच्या नावावर चुकीच्या पद्धतीने किती कनेक्शन घेतले आहेत, हे जाणून घेऊ शकता. विशेष म्हणजे ते कनेक्शन ब्लॉकही केले जाऊ शकतात. याशिवाय ॲपवर जाऊन फोन हरवल्याची किंवा चोरीची तक्रार नोंदवता येईल. यामध्ये उपकरणाचा मागोवा घेता येतो. तसेच फेक मेसेज आणि कॉल्सबाबत तक्रार करता येते.
महत्वाचे म्हणजे, संचार साथी पोर्टल दोन वर्षांपूर्वी, म्हणजेच 2023 मध्ये लॉन्च करण्यात आले होते. मात्र, आता याचे ॲप लॉन्च करण्यात आले आहे. याद्वारे अधिकाधिक लोक याचा वापर करून स्वत:ला सुरक्षित ठेवू शकतील.