चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 20:42 IST2025-11-15T20:41:58+5:302025-11-15T20:42:46+5:30
पब्लिक वायफाय आता सायबर गुन्हेगारांसाठी सर्वात सोपा मार्ग बनला आहे, ज्याद्वारे ते वापरकर्त्यांची खासगी माहिती, बँक डिटेल्स आणि चॅटपर्यंत चोरी करू शकतात.

चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
गुगलने एका नवीन अहवालात धोक्याची घंटा वाजवली आहे. सार्वजनिक वायफाय वापरण्याची तुमची सवय असेल, तर ती तातडीने बदलण्याचा इशारा देखील दिला आहे. कारण, गुगलने स्पष्ट केले आहे की, पब्लिक वायफाय आता सायबर गुन्हेगारांसाठी सर्वात सोपा मार्ग बनला आहे, ज्याद्वारे ते वापरकर्त्यांची खासगी माहिती, बँक डिटेल्स आणि चॅटपर्यंत चोरी करू शकतात.
'Android: Behind the Screen' रिपोर्टमधून खुलासा
गुगलच्या नुकत्याच आलेल्या 'Android: Behind the Screen' या अहवालानुसार, सार्वजनिक वायफाय नेटवर्क आता वेगाने सुरक्षा धोक्याचे कारण बनत आहेत. कंपनीने सांगितले की, हॅकर्स असुरक्षित नेटवर्कचा फायदा घेऊन वापरकर्त्याच्या डिव्हाईसमध्ये प्रवेश करू शकतात आणि त्यांचे पासवर्ड, बँकिंग लॉगिन किंवा इतर संवेदनशील डेटा चोरू शकतात. गुगलने विशेषतः लोकांना सावध केले आहे की, ऑनलाइन बँकिंग, शॉपिंग किंवा कोणत्याही आर्थिक खात्यात लॉगिन करताना पब्लिक वायफायचा वापर बिलकुल करू नये.
वाढत्या मोबाईल स्कॅममुळे धोका दुप्पट
भारत आणि जगातील अनेक देशांमध्ये मोबाईल स्कॅम झपाट्याने वाढत आहेत. गुगलच्या मते, मोबाईल फ्रॉड आता एक जागतिक उद्योग बनला आहे, जो दरवर्षी वापरकर्त्यांकडून अब्जावधी डॉलर्सची फसवणूक करतो. रिपोर्टनुसार, गेल्या वर्षी जगभरात सुमारे $४०० बिलियनची (₹३३ लाख कोटींहून अधिक)फसवणूक मोबाईल स्कॅम्सद्वारे झाली, ज्यात बहुतांश पीडितांना त्यांचे पैसे कधीच परत मिळाले नाहीत.
हॅकर्स फसवणूक कशी करतात?
गुगलने स्पष्ट केले की, आता सायबर गुन्हेगार संघटित पद्धतीने काम करत आहेत. ते चोरी झालेले मोबाईल नंबर खरेदी करतात, ऑटोमेटेड सिस्टीममधून लाखो मेसेज पाठवतात आणि Phishing-as-a-Service साधनांचा वापर करून अगदी खऱ्यासारखी दिसणारी वेबसाइट्स तयार करतात, जेणेकरून लोक स्वतःच त्यांचे लॉगिन क्रेडेन्शियल्स तिथे टाकतील. हे नेटवर्क खूप लवचिक आहेत आणि त्यांचे ठिकाण वारंवार बदलतात.
स्वस्त सिम कार्ड उपलब्ध असलेल्या देशांमध्ये जाऊन नवीन स्कॅम सुरू करणे त्यांच्यासाठी सोपे झाले आहे. कधी हे सायबर गुन्हेगार बनावट डिलिव्हरी किंवा टॅक्स अलर्ट पाठवतात, तर कधी नोकरीची ऑफर किंवा ऑनलाइन रिलेशनशिप्सद्वारे विश्वास जिंकून नंतर पैसे उडवून नेतात.
भावनिक ब्लॅकमेलचा वापर
तांत्रिक फसवणुकीसोबतच, आता स्कॅमर्स भावनिक ट्रिगर्सचाही वापर करत आहेत. ते असे संदेश पाठवतात ज्यामुळे भीती किंवा घबराट निर्माण होते, जसे की "तुमचे अकाउंट बंद करण्यात आले आहे" किंवा "तुमचा परवाना निलंबित होणार आहे". असे संदेश पाहून लोक विचार न करता लगेच कारवाई करतात आणि फसतात. काही स्कॅमर्स तर ग्रुप चॅटमध्ये त्यांच्या साथीदारांना जोडून संभाषण खऱ्यासारखे दाखवतात, जेणेकरून बळी पडलेल्या व्यक्तीचा विश्वास बसावा.
सुरक्षित राहण्यासाठी काय करावे?
गुगलने वापरकर्त्यांना काही महत्त्वाचे सुरक्षा उपाय सुचवले आहेत:
> अतिशय आवश्यक असेल तरच पब्लिक वायफायचा वापर करा.
> बँकिंग किंवा कोणत्याही संवेदनशील वेबसाइटमध्ये लॉगिन करणे टाळा.
> वायफायची 'ऑटो कनेक्ट' सेटिंग बंद ठेवा.
> नेटवर्कचे एन्क्रिप्शन आणि वास्तविकता तपासा.
याव्यतिरिक्त, गुगल सल्ला देतो की, कोणत्याही अनोळखी मेसेजला उत्तर देण्यापूर्वी थांबा, त्या स्रोताची खात्री करा, तुमच्या फोनमध्ये नियमितपणे सुरक्षा अपडेट्स ठेवा आणि बँक स्टेटमेंट वेळोवेळी तपासा.