डेलचे दोन गेमिंग लॅपटॉप्स बाजारपेठेत दाखल

By शेखर पाटील | Published: July 11, 2018 11:15 AM2018-07-11T11:15:22+5:302018-07-11T11:16:42+5:30

एलीयनवेअर १५ आणि १७ हे दोन लॅपटॉप भारतीय बाजारपेठेत उपलब्ध करण्याची घोषणा

Dell launched Alienware 15, Alienware 17 and G Series gaming laptops in India | डेलचे दोन गेमिंग लॅपटॉप्स बाजारपेठेत दाखल

डेलचे दोन गेमिंग लॅपटॉप्स बाजारपेठेत दाखल

googlenewsNext

डेल कंपनीने खास गेमर्ससाठी विकसित केलेले एलीयनवेअर १५ आणि १७ हे दोन लॅपटॉप भारतीय बाजारपेठेत उपलब्ध करण्याची घोषणा केली आहे.

भारतातील गेमिंगची बाजारपेठ प्रचंड गतीने विस्तारत असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. स्मार्टफोनसह गेमिंग कन्सोल, लॅपटॉप, टॅबलेट, संगणक आदींवरून विविध गेम्स खेळणार्‍यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होऊ लागली आहे. या अनुषंगाने अनेक कंपन्या खास गेमर्ससाठी विविध मॉडेल्स सादर करत आहेत. या अनुषंगाने डेल कंपनीने अलीकडेच भारतीय ग्राहकांसाठी सादर केलेल्या विविध लॅपटॉप्सच्या मालिकेतील एलीयनवेअर १५ आणि एलीयनवेअर १७ हे दोन मॉडेल्स खास गेमर्ससाठी लाँच करण्यात आले आहेत. हे दोन्ही मॉडेल्स विंडोज १० या ऑपरेटींग सिस्टीमवर चालणारे आहेत. या दोन्ही लॅप्टॉप्समध्ये इंटेलचे आठव्या पिढीतील अतिशय गतीमान असे कोअर आय-७ आणि आय-९ हे प्रोसेसर देण्यात आले आहेत. अर्थात यामुळे अतिशय वेगवान प्रोसेसींग होत असल्यामुळे गेमिंगमध्ये याचा लाभ होणार आहे. याला एनव्हिडीयाच्या जीफोर्स जीटीएक्स-१०८० या ग्राफिक्स प्रोसेसरची जोड देण्यात आली आहे. याच्या मदतीने उच्च ग्राफिक्सयुक्त गेमींगचा आनंद घेता येणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. तसेच याची रॅम ८ जीबी असून स्टोअरेजसाठी १ टिबीपर्यंतचे विविध पर्याय देण्यात आले आहेत. या दोन्ही लॅपटॉप्समध्ये अनुक्रमे ६८ आणि ९९ वॅट/अवर या क्षमतेच्या बॅटरीज देण्यात आल्या असून त्या उत्तम दर्जाचा बॅकअप देत असल्याचा कंपनीचा दावा आहे.

एलीयनवेअर १५ आणि १७ या दोन्ही लॅपटॉप्समध्ये अनुक्रमे १५ आणि १७ इंच आकारमानाचे आणि फुल एचडी अर्थात १९२० बाय १०८० पिक्सल्स क्षमतांचे डिस्प्ले देण्यात आले आहेत. गेमींगमध्ये किबोर्ड हा घटक खूप महत्वाचा असतो. या अनुषंगाने यामध्ये अतिशय दर्जेदार असा टॅक्टएक्स किबोर्ड देण्यात आला आहे. तर गेमींगमध्ये उपकरण खूप मोठ्या प्रमाणात तापण्याचा त्रास असतो. यावर उपाय म्हणून यामध्ये उत्तम दर्जाची शीतकरण प्रणाली प्रदान करण्यात आली आहे. यामुळे या लॅपटॉपवर दीर्घ काळापर्यंत गेमिंग केले तरी ते तापणार नसल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. यामध्ये ब्ल्यु-टुथ व वाय-फाय कनेक्टीव्हिटी आहे. यासोबत युएसबी, युएसबी टाईप-सी, इथरनेट, एचडीएमआय, मायक्रो-एसडी कार्ड रीडर आदींची सुविधादेखील आहे. यामध्ये हाय डेफिनेशन या प्रकारातील वेबकॅमदेखील दिलेला आहे. ऑडिओ रेकॉन या प्रणालीने युक्त असणारी ऑडिओ सिस्टीम यात देण्यात आलेली आहे. डेलच्या देशभरातील शोरूम्समधून एलीयनवेअर १५ आणि एलीयनवेअर १७ हे गेमींग लॅपटॉप उपलब्ध करणात आले आहेत.
 

Web Title: Dell launched Alienware 15, Alienware 17 and G Series gaming laptops in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.