चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 07:28 IST2025-11-05T07:28:29+5:302025-11-05T07:28:55+5:30
जगातील पहिल्या ‘इंटेलिजंट फ्लाइंग कार फॅक्टरी’मध्ये हे उत्पादन सुरू झाले

चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
बीजिंग: चीनच्या अग्रगण्य ईलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनीने ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन सुरू केले आहे. हे पाऊल टेस्ला आणि अमेरिकन कंपनी एलेफ यांच्या प्रकल्पांपूर्वी टाकल्यामुळे जागतिक वाहन उद्योगात उत्सुकता निर्माण झाली आहे. चीनमधील इलेक्ट्रिक वाहन उत्पादक एक्सपेंग मोटर्सची सहयोगी कंपनी ‘एक्सपेंग एरोहॉट’ने सोमवारी जगातील पहिल्या ‘इंटेलिजंट फ्लाइंग कार फॅक्टरी’मध्ये हे उत्पादन सुरू केले.
ही उडणारी कार पुढील पिढीच्या वाहतुकीच्या व्यावसायिकीकरणाच्या दिशेने एक मोठी झेप मानली जात आहे. दक्षिण चीनमधील ग्वांगडोंग शहरातील ग्वांगझूच्या हुआंगपू जिल्ह्यातील १.२ लाख चौरस मीटरच्या कारखान्यात ‘लँड एअरक्राफ्ट कॅरियर’ नावाचा पहिला वेगळा करता येणारे ईलेक्ट्रिक विमान मॉड्यूल तयार करण्यात आले आहे. या कारखान्याची वार्षिक उत्पादन क्षमता १०,००० विमान मॉड्यूल्स इतकी आहे, तर सुरुवातीला दरवर्षी ५,००० युनिट्स तयार करण्याची क्षमता असेल.
ही वाहने चालकांद्वारेच चालवली जाणार
पूर्ण क्षमतेने उत्पादन सुरू झाल्यावर दर ३० मिनिटांनी एक विमान असेंबल होईल, अशी माहिती कंपनीने दिली आहे. ही वाहने चालकांद्वारेच चालवली जाणार असून, चालकांकडे वाहन चालवण्याचा परवाना आणि हलक्या विमानांचे परवाना (लायसन्स) दोन्ही असणे आवश्यक असेल.
१ अब्ज डॉलरहून अधिक ‘प्री-बुकिंग’ ऑर्डर्स एलेफ कंपनीला उडणाऱ्या कारसाठी प्राप्त झाल्या आहेत.
५,००० ग्राहकांनी एक्सपेंगला ऑर्डर दिली. चिनी कंपन्यांनी गेल्या आठ महिन्यांत २०.१ लाख इलेक्ट्रिक वाहने निर्यात केली.
इलॉन मस्क म्हणतात...
टेस्लानेही स्वतःच्या उडणाऱ्या कारचा प्रकल्प सुरू केल्याची माहिती मिळाली आहे. इलॉन मस्क यांनी सांगितले की, ही कार आतापर्यंतच्या सर्वात लक्षात राहणाऱ्या उत्पादनांपैकी एक ठरेल. टेस्लाची उडणारी कार पुढील काही महिन्यांत प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, अमेरिकन कंपनी एलेफ एरोनॉटिक्सनेही अलीकडेच स्वतःची उडणारी कार चाचणीसाठी सादर केली असून, तिचे व्यावसायिक उत्पादन लवकरच सुरू होणार आहे.