धोक्याची घंटा! एक चूक आणि लीक होऊ शकतात ChatGPT वरील तुमच्या पर्सनल गोष्टी, फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 14:07 IST2026-03-09T14:06:53+5:302026-03-09T14:07:24+5:30
AI चॅटबॉट ChatGPT चा वापर झपाट्याने वाढत आहे. अनेकदा लोक यावर आपल्या पर्सनल गोष्टीही शेअर करतात.

AI फोटो
AI चॅटबॉट ChatGPT चा वापर झपाट्याने वाढत आहे. अनेकदा लोक यावर आपल्या पर्सनल गोष्टीही शेअर करतात. मात्र, अनेक युजर्सच्या मनात एक प्रश्न असतो की, ChatGPT वर केलेली ही चर्चा इंटरनेटवर लीक होऊ शकते का किंवा ती Google वर दिसू शकते का? गेल्या वर्षी एक धक्कादायक प्रकार समोर आला होता, ज्यामध्ये अनेक लोकांचे ChatGPT सोबतचे संवाद इंटरनेटवर उपलब्ध असल्याचं आढळलं होतं. त्यानंतर याच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं.
ChatGPT वर केलेले संवाद डिफॉल्ट रूपात खासगी असतात. याचा अर्थ असा की तुमची चॅट Google वर इंडेक्स होत नाही आणि इतर युजर्स ती पाहू शकत नाहीत. ती कोणत्याही सार्वजनिक वेबपेजप्रमाणे इंटरनेटवर उपलब्ध नसते. Google सारखी सर्च इंजिन्स फक्त तेच पेजेस दाखवतात जे इंटरनेटवर सार्वजनिकरीत्या उपलब्ध असतात. ChatGPT मधील सामान्य संवाद अशा प्रकारचे पेज नसतात.
ChatGPT मधील संवाद 'अशा' प्रकारे होऊ शकतो लीक
काही विशिष्ट प्रकरणांमध्ये ChatGPT वरील संवाद इंटरनेटवर पोहोचू शकतो आणि याचे सर्वात मोठं कारण अनेकदा युजर स्वतः असतो.
चॅट शेअर केल्यास
ChatGPT मध्ये चॅट शेअर करण्याचं फीचर असतं. जर एखाद्या युजरने आपल्या संवादाची 'शेअर लिंक' तयार करून इतरांना पाठवली, तर ती लिंक असलेला कोणताही व्यक्ती ते चॅट पाहू शकतो.
कॉपी करून इंटरनेटवर टाकणं
जर कोणी ChatGPT वरील संवाद कॉपी करून सोशल मीडिया, ब्लॉग, वेबसाइट किंवा फोरमवर शेअर केला, तर अशा वेळी चॅट्स लीक होऊ शकतात.
स्क्रीनशॉटद्वारे लीक
अनेकदा लोक ChatGPT वरील संवादाचे स्क्रीनशॉट घेऊन सोशल मीडियावर पोस्ट करतात, ज्यामुळे ती माहिती सार्वजनिक होते.
थर्ड पार्टी एप्स किंवा ब्राउझर एक्सटेंशन
काही युजर्स ChatGPT वापरण्यासाठी थर्ड पार्टी टूल्स किंवा ब्राउझर एक्सटेंशनचा वापर करतात. ही टूल्स कधीकधी तुमचा डेटा स्टोअर करू शकतात. त्यामुळे नेहमी विश्वासार्ह प्लॅटफॉर्म वापरणं गरजेचं आहे.
OpenAI तुमच्या चॅटचं काय करतं?
ChatGPT बनवणारी कंपनी OpenAI च्या मते, चॅटबॉटची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी काही संवादांचा वापर केला जाऊ शकतो. याचा अर्थ असा नाही की तुमची चॅट इंटरनेटवर सार्वजनिक केली जाते. परंतु अनेकदा कंपनीतील कर्मचारी क्वॉलिटी कंट्रोल आणि ट्रेनिंगसाठी या चॅट्स वाचतात असंही समोर आलं आहे. अशा परिस्थितीतही डेटा लीक होण्याचा धोका वाढतो.
तुमचं चॅट सुरक्षित ठेवण्याचे सोपे उपाय
तुमचा संवाद सुरक्षित राहावा असं वाटत असेल, तर खालील खबरदारी घेणं आवश्यक आहे.
आपल्या चॅटची 'शेअर लिंक' तयार करणं टाळा.
पासवर्ड, बँक तपशील किंवा आयडी नंबर यांसारखी पर्सनल माहिती कधीही शेअर करू नका.
अनोळखी ब्राउझर एक्सटेंशन किंवा AI टूल्स वापरणं टाळा.
संवेदनशील कागदपत्रं ChatGPT वर अपलोड करण्यापूर्वी नीट विचार करा.
AI च्या युगात डिजिटल खबरदारी आवश्यक
AI टूल्स आज काम सोपं करत आहेत, पण त्यांच्या वापरादरम्यान डिजिटल सावधगिरी बाळगणं तितकंच महत्त्वाचं आहे. तज्ज्ञांच्या मते, इंटरनेटवर कोणत्याही प्लॅटफॉर्मचा वापर करताना पर्सनल माहिती शेअर करण्यापूर्वी नेहमी विचार केला पाहिजे.