BSNL युझर्ससाठी खुशखबर, 4G सोबत येणार 5G; बंद होणार का अन्य कंपन्यांची मनमानी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 16:07 IST2022-03-16T16:07:24+5:302022-03-16T16:07:51+5:30
भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) देशात 4G आणि 5G नेटवर्क सेवा एकत्र लाँच करण्याची योजना आखत आहे.

BSNL युझर्ससाठी खुशखबर, 4G सोबत येणार 5G; बंद होणार का अन्य कंपन्यांची मनमानी?
काही दिवसांपूर्वीच खासगी क्षेत्रातील दूरसंचार कंपन्यांनी आपल्या प्रीपेड प्लॅन्सच्या किंमतीमध्ये वाढ केली होती. तर दुसरीकडे सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ला ही आता लोकांची पसंती मिळत आहे. अशातच आता भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) 15 ऑगस्ट 2022 रोजी देशात 4G आणि 5G नेटवर्क सेवा नॉन-स्टँडअलोन (NSA) मोडमध्ये लाँच करण्याची योजना आखत आहे. यामध्ये एंड-टू-एंड 5G नेटवर्कशिवाय 5G सेवा पुरवली जाईल. याचा वापर ऑपरेटर्स सुरूवातीच्या टप्प्यात करतात, जेथे 4G इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून 5G सेवा दिली जाते.
सरकारी दूरसंचार कंपनी एकत्र 5G वर काम करताना 4G साठी प्रुफ ऑफ कॉन्सेप्ट (POC) करत असल्याचा खुलासा CDoT चे कार्यकारी संचालक आणि अध्यक्ष डॉ. राजकुमार उपाध्याय यांनी केला होता. खासगी क्षेत्रातील काही दूरसंचार कंपन्यांनी काही वर्षांपूर्वीच 4G नेटवर्क लाँच केलं होतं. परंतु बीएसएनएलसमोर अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. तसंच आर्थिक समस्यांचाही सामना कंपनीला करावा लागला होता.
बीएसएनएलचं 4G नेटवर्कचं काम आता पूर्ण झालं असून कंपनी कमर्शिअल करार झाल्यावर ही सेवा सुरू करू शकते. तसंच बीएसएनएल 2023 च्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत आपलं 5G स्टँडअलोन कनेक्शनही सुरू करण्याची अपेक्षा आहे. बीएसएनएलनं उत्तर भारतात अंबाला आणि चंडीगडमध्ये चाचणीसाठी टाटा कन्सल्टन्सी इंडिया लिमिटेडसोबत (TCIL) सोबत करार केला आहे. तसंच अन्य स्वदेशी प्रोडक्ट्ससाठी सी-डॉटसोबत भागीदारी केली आहे. बीएसएनएल 2022 मध्ये आपल्या सेवा लाँच करण्यासाठी भारतीय 4G टेक्नॉलॉजीचा वापर करणार आहे.
यापूर्वी DoT नं दिलेल्या माहितीनुसार यावर्षी 13 मेट्रो शहरांमध्ये सर्वप्रथम 5G सेवा रोलआऊट केली जाणार आहे. यामध्ये मुंबई दिल्ली, चेन्नई, गुरुग्राम, चंडीगड, बंगळुरू, अहमदाबाद, जामनगर, हैदराबाद, पुणे, लखनौ आणि गांधीनगर यांचा समावेश असेल. या सेवांमध्ये 4G च्या तुलनेत 10 पट अधिक स्पीड मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.