BSNL ला सुगीचे दिवस! तीन महिन्यांत ३६ लाख युजर्स वाढले; टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्ज वाढविल्याचा परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 14:16 IST2024-12-20T14:16:20+5:302024-12-20T14:16:38+5:30
तिन्ही खासगी टेलिकॉम कंपन्यांपेक्षा खूपच कमी दर भारत संचार निगम लिमिटेडचे आहेत. अनेकांकडे दोन दोन सिमकार्ड आहेत. यामुळे या लोकांना दोन्ही सिमकार्ड सुरु ठेवण्यासाठी रिचार्ज करणे महाग पडत आहे.

BSNL ला सुगीचे दिवस! तीन महिन्यांत ३६ लाख युजर्स वाढले; टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्ज वाढविल्याचा परिणाम
रिलायन्स जिओ, एअरटेल, व्होडाफोन आयडिया या टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्जचे दर अव्वाच्या सव्वा वाढविल्याने सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलला सुगीचे दिवस आले आहेत. बीएसएनएलने ऑगस्ट २०२४ ते ऑक्टोबर २०२४ या तीन महिन्यांत ३६ लाख नवे युजर जोडले आहेत.
तिन्ही खासगी टेलिकॉम कंपन्यांपेक्षा खूपच कमी दर भारत संचार निगम लिमिटेडचे आहेत. अनेकांकडे दोन दोन सिमकार्ड आहेत. यामुळे या लोकांना दोन्ही सिमकार्ड सुरु ठेवण्यासाठी रिचार्ज करणे महाग पडत आहे. यामुळे हे लोक आता बीएसएनएलकडे वळू लागले आहेत.
बीएसएनएलने ऑगस्टमध्ये सर्वाधिक नवे ग्राहक मिळविले होते. यामुळे या महिन्यात बीएसएनएलच्या ग्राहकांच्या संख्येत २५.२ लाखांची वाढ झाली होती. परंतू, सप्टेंबरमध्ये ३.८ लाख आणि ऑक्टोबरमध्ये ७.७ लाख ग्राहक जोडले गेले. तरीही या तिमाहीतील संख्या खूप मोठी आहे.
बीएसएनएल देशभरात ४जी चे जाळे विणत आहे. उशिराने का होईना बीएसएनएलच्या ग्राहकांना ४जीची सेवा मिळण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे कमी किंमत आणि जास्त वेग यासाठी नवे ग्राहक किंवा पोर्ट करणाऱ्यांची पाऊले सरकारी कंपनीकडे वळू लागली आहेत.
बीएसएनएलच्या प्रीपेड कनेक्शनमध्ये जुलै २०२४ मध्ये ८.८४ कोटी एवढए ग्राहक होते, ते ऑक्टोबरमध्ये ९.२ कोटी ग्राहक झाले आहेत.
पोस्टपेड ग्राहकांच्या संख्येत थोडी वाढ झाली आहे. ऑगस्टमध्ये बीएसएनएलचे ४४.२ लाख पोस्टपेड ग्राहक होते. ते ऑक्टोबरमध्ये ४४.८ लाख झाले आहेत. व्होडाफोन आयडियाचे बहुतांश ग्राहक रिचार्जचे दर वाढल्याने बीएसएनएलच्या नेटवर्कवर पोर्ट होत आहेत.