BSNL ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! 3G सेवा कायमची बंद केली जाणार; तुम्हाला मोबाईल अन सिम बदलावे लागणार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 11:24 IST2025-12-26T11:24:13+5:302025-12-26T11:24:51+5:30
BSNL 3G service shut down News: BSNL ने आपल्या सर्व परिमंडळांच्या मुख्य महाव्यवस्थापकांना पत्र लिहून, जिथे शक्य असेल तिथे 3G सेवा बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.

BSNL ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! 3G सेवा कायमची बंद केली जाणार; तुम्हाला मोबाईल अन सिम बदलावे लागणार...
सरकारी टेलिकॉम कंपनी 'भारत संचार निगम लिमिटेड'ने देशातील आपली 3G सेवा टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. कंपनी आता पूर्णपणे 4G नेटवर्कवर लक्ष केंद्रित करत असून 5G च्या तयारीसाठी पावले उचलत आहे. जर तुमच्याकडे अजूनही BSNL चे जुने 3G सिम कार्ड असेल, तर तुम्हाला लवकरच अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
मिळालेल्या माहितीनुसार, BSNL ने आपल्या सर्व परिमंडळांच्या मुख्य महाव्यवस्थापकांना पत्र लिहून, जिथे शक्य असेल तिथे 3G सेवा बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कडून देशभरात BSNL चे 4G टॉवर्स उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आतापर्यंत जवळपास ९७ हजार ४८१ टॉवर्स कार्यान्वित झाले आहेत. BSNL आता जुन्या तंत्रज्ञानाचा त्याग करून नवीन स्वदेशी 4G तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करत आहे. यासाठी कंपनीने नोकिया आणि चिनी कंपनी ZTE सोबतचे जुन्या नेटवर्क मेंटेनन्सचे करार संपवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
ग्राहकांवर काय परिणाम होणार?
BSNL कडे सध्या ९ कोटींहून अधिक ग्राहक आहेत, त्यापैकी फक्त २.२ कोटी ग्राहक 4G वापरतात. उर्वरित मोठा वर्ग अजूनही 2G किंवा 3G सिम वापरत आहे. 3G सेवा बंद झाल्यावर जुन्या सिम कार्डवर नेटवर्क मिळणे बंद होईल. जर तुमचा मोबाईल फक्त 3G सपोर्ट करत असेल, तर तुम्हाला नवीन 4G किंवा 5G स्मार्टफोन खरेदी करावा लागू शकतो.
ग्राहकांनी आता काय करावे?
तुमच्या जवळच्या BSNL ग्राहक सेवा केंद्राला भेट द्या. तुमचे जुने 3G सिम कार्ड देऊन नवीन 4G/5G सिम कार्ड मिळवा. जर तुमचा फोन जुना असेल, तर तो 4G ला सपोर्ट करतो का हे तपासून घ्या.