BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 15:38 IST2026-04-05T15:37:36+5:302026-04-05T15:38:30+5:30
BSNL Plan Update: सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने १०७ रुपयांच्या प्लॅनची वैधता घटवली आहे. जिओ आणि एअरटेलच्या दरवाढीनंतर BSNL चा हा निर्णय ग्राहकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
खाजगी टेलिकॉम कंपन्या जिओ आणि एअरटेल यांनी रिचार्जचे दर वाढवल्यानंतर आता सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने देखील आपल्या लोकप्रिय स्वस्त प्लॅनमध्ये मोठे बदल केले आहेत. BSNL ने आपल्या सर्वात प्रसिद्ध १०७ रुपयांच्या व्हॅल्यू प्लॅनची व्हॅलिडिटी (वैधता) मोठ्या प्रमाणात कमी केली असून, यामुळे सामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री बसणार आहे.
BSNL चा १०७ रुपयांचा प्लॅन हा कमी पैशात सिम कार्ड चालू ठेवण्यासाठी अत्यंत लोकप्रिय होता. याआधी या प्लॅनमध्ये ग्राहकांना जास्त दिवसांची वैधता मिळत होती, मात्र आता हा प्लॅन फक्त २० दिवसांसाठीच वैध असेल. या प्लॅनमध्ये ग्राहकांना ठराविक डेटा आणि व्हॉईस कॉलिंगचे फायदे मिळतात, मात्र व्हॅलिडिटी कमी झाल्यामुळे ग्राहकांना आता महिन्यातून दोनदा रिचार्ज करावा लागू शकतो.
जिओ आणि एअरटेलसोबतची स्पर्धा
जिओ आणि एअरटेलने अलीकडेच त्यांच्या प्लॅन्समध्ये २० ते २५ टक्क्यांनी वाढ केली आहे. अनेक ग्राहक स्वस्त पर्यायासाठी BSNL कडे वळत होते. मात्र, BSNL ने दर न वाढवता थेट 'व्हॅलिडिटी' कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. याला टेलिकॉम क्षेत्रातील 'प्लॅन व्हॅलिडिटी गेम' म्हटले जात आहे.
ग्राहकांवर काय होणार परिणाम?
ज्या ग्राहकांना फक्त येणारे कॉल्स सुरू ठेवायचे आहेत, त्यांच्यासाठी हा प्लॅन आता महागडा ठरणार आहे. पूर्वी महिनाभर चालणारा हा प्लॅन आता २० दिवसांत संपणार असल्याने, वार्षिक खर्चात मोठी वाढ होणार आहे.