गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 17:08 IST2025-11-05T17:07:16+5:302025-11-05T17:08:50+5:30
गुगल क्रोम हा जगात सर्वाधिक वापरला जाणारा वेब ब्राउझर असला तरी, आता तोच भारतातील कोट्यवधी युजर्ससाठी मोठा धोका बनला आहे.

गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
गुगल क्रोम हा जगात सर्वाधिक वापरला जाणारा वेब ब्राउझर असला तरी, आता तोच भारतातील कोट्यवधी युजर्ससाठी मोठा धोका बनला आहे. Windows, macOS आणि Linux ऑपरेटिंग सिस्टमवर चालणाऱ्या क्रोमच्या काही व्हर्जन्समध्ये गंभीर सुरक्षा त्रुटी आढळल्या आहेत. या त्रुटींचा फायदा घेऊन हॅकर्स तुमचा खाजगी डेटा सहज चोरू शकतात. ही धोक्याची घंटा ओळखून, भारत सरकारच्या इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम या सायबर सुरक्षा एजन्सीने हाय-रिस्क वॉर्निंग जारी केली आहे. आता तुम्हाला तुमचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी कोणती पाऊले उचलायची आहेत, हे जाणून घेऊया.
या व्हर्जन्सवर आहे सर्वात मोठा धोका!
सरकारी एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, गुगल क्रोमच्या काही व्हर्जन्सवर सायबर हल्ल्याचा सर्वात जास्त धोका आहे.
Linux: क्रोमचे १४२.०.७४४४.५९ पेक्षा जुने व्हर्जन्स.
Windows आणि Mac: क्रोमचे १४२.०.७४४४.५९/६० पेक्षा जुने व्हर्जन्स.
या व्हर्जन्समध्ये V8मध्ये 'टाईप कन्फ्यूजन', 'इनअॅप्रोप्रिएट इम्प्लिमेंटेशन' तसेच फुलस्क्रीन UI, स्प्लिटव्यू आणि 'पॉलिसी बायपास'सारख्या अनेक गंभीर सुरक्षा त्रुटी आढळल्या आहेत.
नेमका काय धोका आहे?
इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमच्या म्हणण्यानुसार, या गंभीर त्रुटींचा वापर करून सायबर गुन्हेगार तुमचा डेटा चोरी करू शकतात. हल्लेखोर तुमच्या सिस्टमची सुरक्षा व्यवस्था भेदून आत प्रवेश करू शकतात. एकदा प्रवेश मिळाल्यावर, हॅकर्स तुमच्या कॉम्प्युटरचा अॅक्सेस मिळवू शकतात. यासोबतच कॉम्प्युटरमध्ये साठवलेली संवेदनशील माहिती चोरीला जाऊ शकते. फसवणुकीचे स्पूफिंग अटॅक केले जाऊ शकतात.
या धोक्यामुळे वैयक्तिक युजर्ससोबतच विविध संस्था आणि कंपन्यांमध्ये जुन्या व्हर्जनवर क्रोम वापरणाऱ्यांवरही सायबर हल्ल्याचा धोका आहे.
युजर्सने त्वरित काय करावे?
या गंभीर धोक्यापासून वाचण्यासाठी सरकारी एजन्सीने युजर्सना तातडीने क्रोम ब्राउझर अपडेट करण्याची शिफारस केली आहे. गुगलने जुन्या व्हर्जन्समध्ये आढळलेल्या त्रुटींसाठी सुरक्षा पॅच जारी केला आहे. क्रोम अपडेट करून तुम्ही तो पॅच इन्स्टॉल करू शकता.
भविष्यातही अशा धोक्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी, गुगल क्रोमसह तुमच्या सर्व अॅप्स आणि सिस्टम्स नेहमी अपडेटेड ठेवा. आपल्या डेटाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी युजर्सनी तातडीने क्रोम अपडेट करणे आवश्यक आहे.