सावधान! 'ChiChi Call'चं भयंकर जाळं; व्हायरल व्हिडिओच्या नावाखाली सुरू झालाय नवा स्कॅम!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 17:20 IST2026-02-25T17:19:38+5:302026-02-25T17:20:02+5:30
सध्या फेसबुक, टिकटॉक आणि टेलिग्रामवर 'ChiChi Call' किंवा 'लीक्ड व्हिडिओ' अशा नावाच्या पोस्ट वेगाने व्हायरल होत आहेत.

सावधान! 'ChiChi Call'चं भयंकर जाळं; व्हायरल व्हिडिओच्या नावाखाली सुरू झालाय नवा स्कॅम!
सोशल मीडिया युजर्सच्या कुतूहलाचा फायदा घेऊन सायबर गुन्हेगारांनी लुटमारीचा एक नवीन मार्ग शोधला आहे. सध्या फेसबुक, टिकटॉक आणि टेलिग्रामवर 'ChiChi Call' किंवा 'लीक्ड व्हिडिओ' अशा नावाच्या पोस्ट वेगाने व्हायरल होत आहेत. पण सावधान! या लिंकवर क्लिक करणे म्हणजे स्वतःहून आपल्या विनाशाला आमंत्रण देण्यासारखे आहे. सायबर तज्ज्ञांच्या मते, हा एक अत्यंत धोकादायक 'घोस्ट फाईल' स्कॅम आहे.
काय आहे हा प्रकार?
फिलीपिन्सची प्रसिद्ध लाइफस्टाइल इन्फ्लुएंसर वेरा हिल, जिचे ऑनलाइन नाव 'ChiChi' आहे, तिचा खाजगी व्हिडिओ लीक झाल्याचा दावा या पोस्टमध्ये केला जात आहे. मात्र, तपासात असे समोर आले आहे की, असा कोणताही व्हिडिओ अस्तित्वात नाही. केवळ लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी एडिट केलेले फोटो किंवा दुसऱ्याचे व्हिडिओ वापरून हा संभ्रम निर्माण केला जात आहे.
असा विणला जातो डिजिटल सापळा
हा स्कॅम 'SEO पॉइझनिंग' या तंत्रावर आधारित आहे. जेव्हा युजर अशा व्हिडिओच्या शोधात गुगल किंवा सोशल मीडियावर सर्च करतो, तेव्हा गुन्हेगारांनी तयार केलेले बनावट पेजेस समोर येतात.
फिशिंग अटॅक: लिंकवर क्लिक करताच फेसबुक लॉग-इनचा बनावट पेज उघडतो. तिथे युजरने माहिती भरली की त्याचे अकाऊंट हॅक होते.
मॅलवेअरचा शिरकाव: व्हिडिओ पाहण्यासाठी 'प्लगइन' किंवा 'फाईल' डाऊनलोड करायला सांगितली जाते. प्रत्यक्षात तो एक व्हायरस असतो, जो तुमच्या फोनमधील बँकिंग पासवर्ड आणि खाजगी माहिती चोरतो.
आयपी ट्रॅकिंग: लिंकवर क्लिक करताच तुमचा आयपी ॲड्रेस ट्रॅक करून तुमचे लोकेशन आणि इतर माहिती गुन्हेगारांकडे पोहोचते.
कायदेशीर कचाट्यात अडकू नका!
भारतात माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० आणि भारतीय न्याय संहितेनुसार, कोणाचीही संमती नसताना खाजगी किंवा 'डीपफेक' कंटेंट पाहणे, शेअर करणे किंवा पसरवणे हा गंभीर गुन्हा आहे. अशा खोट्या व्हायरल क्लिप फॉरवर्ड केल्यास तुम्हाला तुरुंगवारीची शिक्षा देखील होऊ शकते. लक्षात ठेवा, इंटरनेटवर दिसणारी प्रत्येक व्हायरल गोष्ट खरी नसते; अनेकदा तो तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा डिजिटल सापळा असू शकतो.
कशी घ्याल काळजी?
१. अशा कोणत्याही खळबळजनक किंवा 'लीक्ड' व्हिडिओच्या लिंकवर क्लिक करू नका.
२. जर एखाद्या लिंकवर क्लिक केल्यावर वारंवार जाहिराती किंवा लॉग-इन पेज येत असेल, तर लगेच ती विंडो बंद करा.
३. अनोळखी स्त्रोताकडून आलेली कोणतीही फाईल किंवा ॲप डाऊनलोड करू नका.
४. अशा पोस्ट रिपोर्ट करा जेणेकरून इतर लोक या जाळ्यात अडकणार नाहीत.