सावधान! मोबाईलवर येणारा एक मेसेज तुमचं बँक खातं रिकामं करू शकतो; काय आहे हा नवा 'SIM Box Scam'?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 11:45 IST2025-12-29T11:44:15+5:302025-12-29T11:45:05+5:30
तुम्हाला कधी अनोळखी नंबरवरून स्वस्त लोन, लॉटरी किंवा गुंतवणुकीचे मेसेज आले आहेत का? जर हो, तर तुम्ही सायबर गुन्हेगारांच्या रडारवर असू शकता.

सावधान! मोबाईलवर येणारा एक मेसेज तुमचं बँक खातं रिकामं करू शकतो; काय आहे हा नवा 'SIM Box Scam'?
तुम्हाला कधी अनोळखी नंबरवरून स्वस्त लोन, लॉटरी किंवा गुंतवणुकीचे मेसेज आले आहेत का? जर हो, तर तुम्ही सायबर गुन्हेगारांच्या रडारवर असू शकता. केंद्रीय अन्वेषण विभागाने अर्थात सीबीआयने नुकताच दिल्ली, नोएडा आणि चंदीगडमध्ये पसरलेल्या एका मोठ्या सायबर नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत हजारो बेकायदेशीर सिम कार्ड आणि हाय-टेक उपकरणे जप्त करण्यात आली असून 'सिम बॉक्स स्कॅम'चा हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
नेमका काय आहे हा 'SIM Box?
'सिम बॉक्स' हे एक विशेष हाय-टेक मशीन आहे. यात एकाच वेळी शेकडो किंवा हजारो सिम कार्ड बसवता येतात. या तंत्रज्ञानाचा वापर करून सायबर चोर परदेशातून येणारे कॉल भारतीय स्थानिक कॉलसारखे भासवतात. यामुळे केवळ टेलिकॉम कंपन्यांचे आर्थिक नुकसान होत नाही, तर कॉल नेमका कुठून आला आहे, याचे लोकेशन ट्रॅक करणे पोलिसांनाही कठीण जाते. गुन्हेगार याच मशीनचा वापर करून दररोज लाखो लोकांना फसवणुकीचे मेसेज धाडतात.
कशी होते तुमची फसवणूक?
गुन्हेगार बनावट कागदपत्रांच्या आधारे मोठ्या प्रमाणात सिम कार्ड खरेदी करतात. हे सिम कार्ड मशीनमध्ये टाकून दररोज लाखो लोकांना फिशिंग लिंक्स, बनावट बँक अलर्ट किंवा बक्षीस जिंकल्याचे मेसेज पाठवले जातात. जसा एखादा सामान्य नागरिक त्या लिंकवर क्लिक करतो किंवा आपली माहिती शेअर करतो, तसा गुन्हेगारांना त्याच्या बँक खात्याचा आणि पर्सनल डेटाचा एक्सेस मिळतो. काही वेळातच तुमची आयुष्यभराची कमाई लंपास होऊ शकते.
राष्ट्रीय सुरक्षेलाही धोका!
तज्ज्ञांच्या मते, सिम बॉक्स स्कॅम केवळ आर्थिक फसवणुकीपुरता मर्यादित नाही. परदेशी कॉल्सची ओळख लपवली जात असल्याने हे राष्ट्रीय सुरक्षेसाठीही मोठे आव्हान ठरू शकते. परदेशी गुन्हेगार भारतात बसलेल्या हस्तकांच्या मदतीने हे रॅकेट चालवत असल्याचे तपासात समोर आले आहे.
स्वतःचा बचाव कसा करावा?
अनोळखी लिंक्स टाळा: कर्ज, नोकरी किंवा लॉटरीचे आमिष दाखवणाऱ्या कोणत्याही लिंकवर चुकूनही क्लिक करू नका.
स्पॅम फिल्टर: आपल्या फोनमध्ये स्पॅम फिल्टर किंवा 'ब्लॉक' फीचर सुरू ठेवा, ज्यामुळे संशयास्पद मेसेज आपोआप थांबवले जातील.
तातडीने तक्रार करा: जर तुम्हाला असा कोणताही संशयास्पद अनुभव आला, तर तात्काळ सरकारी सायबर क्राईम पोर्टल cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा.
बँकेशी संपर्क: फसवणूक झाल्याचा संशय येताच आपले पासवर्ड बदला आणि बँकेला माहिती देऊन खाते सुरक्षित करा.